संजयमामा, तुम्ही आता थेट राष्ट्रवादीत या! जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil told mla sanjay shinde to join ncp

संजयमामा, तुम्ही आता थेट राष्ट्रवादीत या! जयंत पाटील

करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय शिंदे तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आमदार झालेला आहात. आता तुम्ही अपक्ष की पक्ष काही म्हणत बसू नका, संजयमामा तुम्ही थेट राष्ट्रवादीत या! असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज करमाळ्याचे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार दीपक साळुंखे, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, आप्पासाहेब झांजुर्णे, तानाजी झोळ, चंद्रकांत सरडे, नलिनी जाधव, ॲड. सविता शिंदे उपस्थित होते.करमाळा येथे आमदार संजय शिंदे यांच्या कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आमदार संजय शिंदे यांनी आत्तापर्यंत सांगितलेल्या कोणत्याही कामाला आम्ही नकार दिलेला नाही. आमदार संजय शिंदे यांनी आता कुठलाही विचार न करता राष्ट्रवादी पक्षाचा विचार करून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादीला ठामपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

आमदार संजय शिंदे म्हणाले, २०१९ लोकसभेची निवडणूक मी पवार साहेबांच्या शब्दावर राष्ट्रवादीकडून लढविली. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती. मला कोणाचा ना कोणाचा पाठिंबा घेणे गरजेचे होते. त्यामुळे मी पवारसाहेबांना, अजितदादांना सांगितली व अपक्ष निवडणूक लढलो. मी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. मी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता किंवा भाजपला पाठिंबा दिलेला नव्हता. माझी स्पष्ट अट होती की फडणवीससाहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच माझा तुम्हाला पाठिंबा आहे.

व्यापीठावरील बॅनर चर्चेत

बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्राऐवजी करमाळा तालुका विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक असा व्यासपीठावर बॅनर लावण्यात आलेला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलायला उभा राहताच. मागे बॅनरकडे ओळून पाहत आमच्या या पक्षाच्या दौऱ्याचे नाव परिवार संवाद यात्रा असे आहे. मात्र संजयमामा बॅनरवर करमाळा तालुका विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, असे लिहिले आहे असे म्हणताच व्यासपीठावरील उपस्थितांनी बॅनरकडे वळून पाहिले.

Web Title: Jayant Patil Told Mla Sanjay Shinde To Join Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top