जेऊर रेल्वे स्टेशनवरून धोकादायक प्रवास; सकाळच्या वेळी पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी एकच गाडी

जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी अनेकवेळा तक्रारी, निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
jeur railway station dangerous travel cause non availability of train solapur
jeur railway station dangerous travel cause non availability of train solapurSakal

चिखलठाण/जेऊर : सकाळी पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी एकच रेल्वे असल्याने जेऊर रेल्वे स्टेशनवरून दाराला लटकून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. हुतात्मा एक्स्प्रेसच्या थांब्याचा निर्णय होऊन प्रवाशांची गैरसोय कधी थांबणार? असा सवाल केला जात आहे. तक्रारी, निवेदने दिल्यानंतर आश्वासन मिळूनही थांब्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी अनेकवेळा तक्रारी, निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील व्यापारिक दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक, व्यापारी, कामगार आणि प्रवाशांना सोयीच्या असलेल्या या स्थानावरून हुतात्मा एक्स्प्रेस थांबत नसल्याने मुंबई, पुणे व दौंडकडे जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.

हुतात्मा एक्स्प्रेस सध्या सोलापूरहून सुटते. पण जेऊरला आरक्षित तिकीट करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगत याठिकाणी थांबा मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

जेऊर येथे थांबणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसमध्ये असंख्य प्रवासी जेऊर स्थानकावरून चढतात व उतरतात. तसेच हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस या गाडीचे स्लीपर कोच कमी केलेली असून फक्त दोन स्लीपर कोच आहेत. त्यामुळे स्लीपर कोचची गर्दी व जनरल डब्यांची गर्दी जेऊर स्थानकावर खूप आहे.

त्यामुळे प्रवासी ए.सी. कोचमध्येसुद्धा चढतात व दारामध्ये लटकून जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झालेला आहे. या प्रचंड गर्दीमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी प्रवासी संघटनेने ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तरीही प्रशासन यावर ठोस भूमिका घेत नाही. ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे हाल होत आहेत,

दरम्यान, प्रवासी संघटना, रेल्वे प्रवासी, नागरिक, आमदार, खासदारांनी रेल्वे प्रशासनाला विनंती तसेच तक्रारी करून, निवेदने देऊन, आंदोलने करण्याचा इशारे देऊनही जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, पण, रेल्वे प्रशासनास जाग आली नाही. जेऊर हे करमाळा, जामखेड, परांडा या तालुक्यांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून त्याचा विकास अमृत भारत योजनेतून होत असून, एक्स्प्रेस गाड्या येथे थांबवाव्यात यासाठी आंदोलन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

जेऊर रेल्वे स्टेशनवरून पुणे व मुंबई येथे असंख्य ग्राहक, प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी दररोज ये-जा करतात. त्यामुळे जेऊरला हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा मिळणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासन व खासदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

— सुहास सूर्यवंशी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, जेऊर, ता. करमाळा

दररोज सकाळी जेऊर स्टेशनवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दाराला लटकून प्रवास करण्याची वेळ लोकांवर येत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने हुतात्माला थांबा देण्याचा निर्णय व्हावा अथवा या वेळेत नवीन गाडी सुरू करण्याचे प्रयत्न व्हावेत

— अतुल पोळ, नियमीत प्रवासी, जेऊर, ता. करमाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com