
आव्हाडांनी पदाची प्रतिष्ठा घालवू नये
जितेंद्र आव्हाड हे सोलापूरचे पालकमंत्री झाले आहेत. पण, पालकमंत्र्यांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही. त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा घालवू नये. आम्ही दिवा लावणाऱ्या संस्कृतीमधील आहोत. पण, आव्हाड हे दिवा विझविणाऱ्या संस्कृतीमधील असल्यानेच त्यांनी ही भाषा केली आहे. अशा बोलण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची कमी होणार नाही.
शहाजी पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष, भाजप.
आव्हाड-देशमुखांमध्ये कलगीतुरा
सोलापूर ः देश कोरोनासारख्या मोठ्या आजाराशी लढत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच आवाहन केले आहे. मात्र, विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या दिवशी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जनतेला भडकवण्याचे काम करू नये, असा टोला आमदार सुभाष देशमुख यांनी लगावला आहे.
पालकमंत्री आव्हाड यांनी मोदी यांच्या दिवे लावण्याच्या वक्तव्याबद्दल मोदी हे मूर्ख आहेत असे विधान सोलापुरात केले होते. त्या वक्तव्याचा समाचार आमदार देशमुख यांनी घेतला. देशात कोरोनासारखी महामारी आल्यामुळे पंतप्रधानांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याबद्दल त्यांनी देशाची माफीही मागितली आहे. कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हीच भावना ठेवून पंतप्रधानांनी रविवारी (ता. 5) सर्वांना दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विरोधक या गोष्टीचा बाऊ करत आहेत. आज पालकमंत्री आव्हाड हे पहिल्यांदाच सोलापुरात आले आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. जर मनात देशप्रेम असेल तर ही भाषा पालकमंत्र्यांना शोभणारी नाही. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही मोदी यांच्या या आवाहनाचे स्वागत केले आहे. असे असताना आव्हाडांनी विरोध करणे म्हणजे चुकीचे असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
आजच्या संकटाच्या काळात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची गरज आहे. राजकीय लढाई लढण्यासाठी आम्ही व भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीर आहे. पण आता ही वेळ नाही. कोरोनाचे संकट गेल्यानंतर आपण राजकीय लढाई लढू. आता ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरविण्याची आहे आहे. भाजपचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता देशाच्या सेवेसाठी आणि ज्या लोकांची उपासमार होत आहे ती थांबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
Web Title: Kalgitura Among Awhad Deshmukh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..