रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोच्या ताब्यात करमाळ्याचा "आदिनाथ' ! 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय 

aadinath_sugars
aadinath_sugars

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. आदिनाथ कारखान्यावरील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज असल्याने या बॅंकेने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. गेल्या 15 वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्‍मी बागल यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाची एकहाती सत्ता होती. मात्र संचालकांमधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकांचे अंतर्गत एकमेकांवर होणारे आरोप- प्रत्यारोप अशा कारणांनी हा कारखाना अडचणीत येत गेला. 

मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना बारामती ऍग्रोला देण्यात आला आहे. करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा येथील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय मानला जात होता. मात्र हा कारखाना मागील दहा वर्षांपासून रडतखडत चालत असल्याने कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कारखाना जवळ असूनही बाहेरील कारखान्यांना ऊस द्यावा लागत होता. 

हा कारखाना सहकारीच राहावा, असे अनेकांना वाटत असताना बारामती ऍग्रोने हा कारखाना चालवण्यास घ्यावा, असाही सूर शेतकऱ्यांमधून येत होता. कारखान्याच्या चहूबाजूंनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड असताना देखील कारखाना चांगल्या पद्धतीने चालू शकला नाही. आदिनाथ कारखान्याच्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न तर महाराष्ट्रभर गाजला होता. अशा परिस्थितीत आदिनाथ कारखान्यावरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना कारखाना बंद अवस्थेत राहिला. त्यामुळे आदिनाथ कारखाना विकला जाणार की भाडेतत्त्वावर चालवला जाणार? याविषयी गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती. 

आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आमदार रोहित पवार उत्सुक असल्याचे वारंवार बोलले जात होते. मात्र करमाळ्याचे आमदार संजय शिंदे देखील हा कारखाना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिंदे समर्थकांनी अनेकवेळा सांगितले होते. आमदार शिंदे यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 

आदिनाथ कारखाना बारामती ऍग्रोने चालवायला घेतल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांची कारखान्याला ऊस घालवण्यासाठी होणारी फरफट थांबून इतर कारखान्यांपेक्षा चांगला भाव मिळेल, अशी आशा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आजच्या निर्णयाने वाटू लागली आहे . 

करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवताना बारामती ऍग्रोच्या कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही. आदिनाथ कारखाना आदर्श पद्धतीने चालविण्याचा आमचा मानस आहे. ज्या पद्धतीने बारामती ऍग्रो हा कारखाना उत्कृष्ट पद्धतीने चालवला जातो, त्याच पद्धतीने आदिनाथ कारखाना नियोजनबद्ध पद्धतीने चालवला जाईल. 
- सुभाष गुळवे, 
उपाध्यक्ष, बारामती ऍग्रो 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com