कोठे, चंदनशिवे, शेख अन्‌ बेरिया राष्ट्रवादीतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kothe Chandanshive Sheikh Beria joined NCP in Solapur

कोठे, चंदनशिवे, शेख अन्‌ बेरिया राष्ट्रवादीतच

सोलापूर - शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पण, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या मनात अजूनही महाविकास आघाडीच असून, भाजपला पराभूत करणे हाच त्यांचा हेतू आहे. त्यामुळे महापालिकेत तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत, आम्ही राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, तौफिक शेख व आनंद चंदनशिवे यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून निधी मिळवताना शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांना राष्ट्रवादीचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा आधार मिळाला. त्यांनी दिलेल्या निधीतून माजी नगरसेवकांच्या विजयाची वाट सुकर झाली. अनेकांनी आमदारकीची स्वप्नेही रंगविली आहे.

आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बदलल्याने पक्षांतराच्या वाटेवरील कोठे, ॲड. बेरिया, चंदनशिवे, तौफिक शेख यांचा विचार बदलणार की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण, सरकार बदलले तरीदेखील आम्ही निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतच असू, तिन्ही पक्षांना सोबत घेऊन महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आणू, असे त्या नेत्यांनी स्पष्ट केले. नुसते आम्ही नाही, तर आमच्यासोबत वेगवेगळ्या राजकीय पक्षातील अनेक माजी नगरसेवक, नेतेदेखील येतील, असा विश्वास महेश कोठेंनी व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांत सर्वांचाच पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

२१ माजी नगरसेवक करणार पक्षांतर?

माजी महापौर महेश कोठे, ॲड. बेरिया यांच्या पक्षप्रवेशाला महाविकास आघाडीची अडचण होती. पण, आता महाविकास आघाडीचे सरकार नसल्याने त्यांच्या पक्षांतरातील प्रमुख अडचण दूर झाली आहे. दरम्यान, कोठे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते, विडी घरकुल परिसरातील आठ माजी नगरसेवक, विधानसभेला उमेदवार राहिलेला शिवसेनेचा आणखी एका माजी नगरसेवासह चंदनशिवे, तौफिक शेख व ॲड. बेरिया या सर्व नेत्यांसह जवळपास २१ समर्थक नगरसेवकांचाही त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Kothe Chandanshive Sheikh Beria Joined Ncp In Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..