esakal | बोरामणी विमानतळासाठी दहा कोटींची मागणी ! भूसंपादन अंतिम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Airport

बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत 549.34 हेक्‍टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. खासगी वाटाघाटीतून 29 हेक्‍टर 94 हेक्‍टर जमीन संपादित केली जात आहे. त्यापैकी चार ते पाच हेक्‍टर जमिनीचे संपादन शिल्लक आहे. 

बोरामणी विमानतळासाठी दहा कोटींची मागणी ! भूसंपादन अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : बोरामणी (दक्षिण सोलापूर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ प्रस्तावित असून, त्यासाठी आता भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी 40 कोटी रुपये दिल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही पुढे सुरू झाली. आता आणखी दहा कोटींची गरज असून तसा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने राज्य सरकारला पाठविला आहे. 

बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत 549.34 हेक्‍टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. खासगी वाटाघाटीतून 29 हेक्‍टर 94 हेक्‍टर जमीन संपादित केली जात आहे. त्यापैकी चार ते पाच हेक्‍टर जमिनीचे संपादन शिल्लक आहे. विमानतळासाठी जमीन संपादित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 40 कोटींचा निधी दिला. आता आणखी रक्‍कम लागणार असून त्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

महामार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढल्यानंतर सोलापूर शहर - जिल्ह्यात उद्योगवाढीस मोठी संधी आहे. अनेक उद्योजक सोलापूरमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु विमानसेवेचा अडथळा आहे. या पार्श्‍वभूमीवर बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. या विमानतळासाठी 49 टक्‍के राज्य सरकार आणि 51 टक्‍के केंद्र सरकारचा हिस्सा असणार आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी मोठा खर्च राज्य सरकारने केल्याने, ती रक्‍कम राज्य सरकारचा हिस्सा असणार आहे. त्यामुळे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण क्षेत्राला वॉल कपांउंड, रन-वे, टर्मिनल बिल्डिंग अशी विविध कामे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून केली जातील, असेही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

भूसंपादनानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून पुढील कामे 
बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य केले जाईल, असे सरकारने अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, भूसंपादनासाठी 40 कोटी मिळाले असून आणखी दहा कोटी द्यावेत, असा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील कामे होतील. 
- अनिल पाटील, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, एमएडीसी, मुंबई 

ठळक बाबी... 

  • बोरामणी विमानतळासाठी संपादित झाली 576 हेक्‍टर जमीन 
  • खासगी वाटाघाटीतून 20 जणांकडील जमिनीपैकी 17 जणांची जमीन केली संपादित 
  • वन विभागाकडून 33 हेक्‍टर जमीन मिळविण्याची कार्यवाही सुरू; नागपूरवरून मुंबईला आला प्रस्ताव 
  • खासगी वाटाघाटीतून भूसंपादनासाठी दिले 33.35 कोटी; आणखी दहा कोटींची मागणी 
  • जमिनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून होईल पुढील कार्यवाही 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image