esakal | भीमा कारखान्याविरूद्ध आंदोलने झाल्याने शेतकरी व कारखान्याचे मोठे नुकसान 
sakal

बोलून बातमी शोधा

Large losses to farmers and factories due to agitation against Bhima sugar factory

कारखाना कार्यक्षेत्रात यंदा गळित हंगामासाठी चांगला ऊस उपलब्ध आहे. यंदाच्या हंगामात भीमा साखर कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून आठ कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठरविले असून कोणी कितीही टीका करू द्या, येत्या तीन वर्षात भीमा कर्जमुक्त करू, असेही श्री महाडिक म्हणाले. 

भीमा कारखान्याविरूद्ध आंदोलने झाल्याने शेतकरी व कारखान्याचे मोठे नुकसान 

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : भीमा कारखान्याच्या विरोधात अनेक आंदोलने, उपोषणे झाली. त्यामुळे शासनाच्या कारवाईला कारखान्याला सामोरे जावे लागले. भीमाची थकीत एफआरपी केवळ 13 कोटी होती तर शासनाने कारवाई दरम्यान 80 कोटींची साखर ताब्यात घेतली. त्यामुळे अडचण झाली. बॅंकेचे येणारे सहा कोटी रुपयांचे व्याज विनाकारण भरावे लागले. परिणामी शेतकऱ्यांचे व कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भीमाचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी सांगितले. 


टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा व गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून अध्यक्ष महाडिक व त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक व ज्येष्ठ पाच सभासद यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 


श्री. महाडिक पुढे म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रात यंदा गळित हंगामासाठी चांगला ऊस उपलब्ध आहे. यंदाच्या हंगामात भीमा साखर कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून आठ कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठरविले असून कोणी कितीही टीका करू द्या, येत्या तीन वर्षात भीमा कर्जमुक्त करू. राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची अवस्था बिकट झाली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे व सकारात्मकतेमुळे राज्यातील साखर कारखान्यांना थकहमी मिळाली आहे. त्यामुळे आज सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऊस उपलब्ध नसल्याने व दुष्काळामुळे भीमा कारखाना यापूर्वी बंद ठेवावा लागला. मात्र चालू वर्षी गेल्या दोन गळीत हंगामाचा दोन वर्षाच्या बॅकलॉग भरून निघणार आहे. भीमाच्या पट्ट्यात चांगला ऊस उपलब्ध असल्याने अनेक कारखाने हेलपाटे घालत आहेत. विविध आमिषे दाखवत आहेत. मात्र सभासदांनी सर्व ऊस भीमालाच गाळपासाठी द्यावा. सभासदांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांची थकित एफआरपी ची रक्कम व दिवाळीसाठी साखर सभासदांना देण्याचे आयोजन केले आहे. चालू हंगामात पहिल्या दिवसापासून वीज निर्मितीस प्रारंभ होणार आहे. शासनाबरोबर वीज विक्रीचा करारही झाला आहे. त्या माध्यमातून कारखान्याला 40 कोटी रुपये मिळणार आहेत. यावेळी पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, विश्वजीत महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, सर्व संचालक, सभासद, खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे