उशीरा केलेले जेवणच आजारांचे मूळ कारण! जेवणाची ‘ही’ वेळ पाळा अन्‌ व्याधी टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


शारीरिक आणि मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी व्यायाम, योगा आणि ध्यानाचा सराव करा.
उशीरा केलेले जेवणच आजारांचे मूळ कारण! जेवणाची ‘ही’ वेळ पाळा अन्‌ व्याधी टाळा

उशीरा केलेले जेवणच आजारांचे मूळ कारण! जेवणाची ‘ही’ वेळ पाळा अन्‌ व्याधी टाळा

सोलापूर : सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचा प्राण म्हणजे आहार. प्रसन्नता, वर्ण, उत्तम स्वर, जीवन, प्रतिभा, संतोष, शरीरयष्टी, बल असे सर्व घटक आहारावरच अवलंबून असतात. आहारापासूनच मानवी शरीर तयार झाले असून, व्याधींची निर्मितीसुद्धा आहारापासूनच होते. त्यामुळे प्रवासातील विलंब, ट्रॅफिक, डेडलाइन्स, कामाचा ताण अशा बाबींमुळे बऱ्याचदा जेवायला वेळ होतो. पण, काहींना रात्री उशिराच जेवायची सवय असते. पण, रात्री उशिरा जेवल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. सायंकाळी आठनंतर जेवण करणे आरोग्यासाठी खूपच नुकसानकारक ठरू शकते. जेवण व झोपण्याच्या वेळेत किमान दोन तासांचे अंतर असावे. रात्री उशिरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सूर्यास्तापूर्वीची वेळ आरोग्यासाठी खूप उत्तम मानली जाते.

वजन वाढण्याचा धोका

रात्री उशिरा जेवल्याने पोट तथा वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे रात्री उशिरा जेवणे हेच आहे. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास अगोदर जेवायलाच हवे. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्‌भवत नाहीत.

झोप अपूर्ण अन्‌ रक्तदाब अनियंत्रित

रात्री उशिरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा अन्य समस्या जाणवतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेकदा झोपल्यावर अस्वस्थ वाटू लागते. अपचनाची समस्या जाणवते. त्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल अति प्रमाणात वाढतात. त्यामुळे सायंकाळी आठपूर्वीच जेवण करणे आरोग्यासाठी उत्तम असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

हिवाळ्यात जेवणात ‘हे’ पदार्थ असू द्या

बाजरी व नाचणीची भाकरी खाल्ल्यास त्यातून जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. गाजर, रताळे देखील आहारात असावे. डिंकाचे लाडू पौष्टिक असून त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चहात तुळस, वेलची, लवंग किंवा दालचिनी असू द्या. तूप खाणे हिवाळ्यात फायदेशीर आहे. कांदा हा शरीराला ऊर्जा देतो. कांद्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हिवाळ्यात केळी देखील आरोग्यवर्धक मानली जाते. लसूण, मोड आलेले शेंगदाणे देखील खावेत.

सूर्यास्तापूर्वीचे जेवण आरोग्यवर्धक

सूर्य उगवतो त्यावेळी आपले शरीर फुलत असते. सूर्यास्तावेळी आपले शरीरदेखील आकुंचन पावत असते. त्यामुळे रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजेच सायंकाळी सात वाजण्यापूर्वीच करणे आरोग्यवर्धक ठरते. रात्रीचे जेवण पूर्णत: जोवर पचन होऊन मलविसर्जन होत नाही, तोवर सकाळचे जेवण करू नये. जेवण पूर्णपणे पचन झाल्यावरच झोपेतून उठावे, असे आयुर्वेदात नमूद आहे. कडकडून भूक लागल्यावरच जेवायला हवे. भूक नसताना जेवल्यास अग्नी प्रदीप्त राहात नाही. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. सकाळच्या जेवणात शक्यतो तूप आणि भात असावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे प्रमाणात सेवन करावे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

अन्न हेच पूर्णब्रह्म...

आयुर्वेदानुसार मधुराचे (गोड) सेवन पहिल्यांदा करायला हवे. गोड पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात म्हणून जड पदार्थ पहिल्यांदा खावेत. अन्न हेच पूर्णब्रह्म असून, जेवणातून आपण जे काही खातो, त्यातून काहीना काही ऊर्जा देणारे मिळत असते. प्रत्येक द्रव्य (अन्नद्रव्य) हे औषधी मानले आहे. ऋतूनुसार जेवणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हिवाळ्यात पचन चांगले होते, भूक चांगली लागते म्हणून जड पदार्थ खाऊ शकतो. उन्हाळ्यात तहान जास्त लागते, त्यासाठी द्रवपदार्थ जास्त खावेत. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते म्हणून त्या काळात हलके जेवण करावे.