
पहिली पत्नी असतानाही केला दुसरा विवाह
सोलापूर : व्यवसायासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणत आरोपी पतीसह दिर, सासू, सासऱ्याने विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद विवाहितेने एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. तसेच पहिली पत्नी हयात असतानाही आरोपी पतीने बेकायदेशीरपणे दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सासरच्यांनी सातत्याने माहेरुन पैसे आण म्हणून छळ केला. विवाहानंतर काही दिवस व्यवस्थीत नांदवले मात्र, त्यानंतर घरातील विविध कारणांवरुन सासरच्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केले, उपाशी ठेवले, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पती आलम युनुस पटेल, दिर मुबारक युनुस पटेल, सासू मेहताबबी युनुस पटेल आणि सासरा युनुस लाल पटेल यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बियरच्या बाटलीने मारहाण
सलगर वस्ती पोलिसांत आमच्याविरुध्द तक्रार का दिली म्हणून आरोपीने डोक्यात बियरची बाटली मारुन जखमी केल्याची फिर्याद शहाजी सदाशिव हतागळे (रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे.
सेटलमेंट फ्रि कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण मंदिरसमोरील रोडवर थांबल्यानंतर आरोपींनी जवळ येवून तु आमच्याविरुध्द सलगर वस्ती पोलिसांत तक्रार का, दिली असा जाब विचारला. तसेच शिवीगाळ करीत संतोष व्यकंटेश जाधव याच्या सांगण्यावरुन हरिष मारुती जाधव याने त्याच्याजवळील बियरची बाटली डोक्यात मारली. त्यामध्ये डोक्याला दुखापत झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आरोपी संतोष जाधव व हरिष जाधव या दोघांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चालत्या बसमधून लांबवली पर्स
अक्कलकोटवरुन सोलापुकरडे बसमधून प्रवास करताना कुंभारीदरम्यान नजर चुकवून चोरट्यांनी माझ्याजवळील पर्स चोरली, अशी फिर्याद माधुरी वसंत पाटील (रा. वेळगे पाळी डिचोली, उत्तर गोवा) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली.
सोमवारी (ता. 16) अक्कलकोटवरुन सोलापुरकडे बसमधून येत होते. त्यावेळी कुंभारीपर्यंत येईपर्यंत पर्स माझ्याकडे होती. मात्र, कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी नजर चुकवून पर्स चोरली. त्यामध्ये साडेआठ हजार रुपये रोख, बॅंकांचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदान व आधार कार्ड होते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बसमधील अनोळखी पाच व्यक्तींनी पर्स चोरल्याचेही माधुरी पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फौजदार चावडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी आता बसमधील प्रवाशांची माहिती घ्यायला सुरवात केली आहे.
शिवीगाळ करीत कार्यालयाला ठोकले कुलूप
दक्षिण सदर बझार, वाळवेकर नर्सिंग होमशेजारील पाटील एन्ड कंपनीच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून दोघांनी कामगारांना शिवीगाळ करीत बाहेर काढले. मालकालाही आरेरावीची भाषा वापरत कार्यालयास कुलूप ठोकल्याची फिर्याद अभय अनिल आळंदकर यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे. त्यानुसार प्रतिक प्रकाश महाजन, प्रथमेश प्रकाश महाजन (रा. जुळे सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दोन्ही आरोपी पाटील एन्ड कंपनीच्या मालकांचे नातेवाईक आहेत. दोघेही सोमवारी (ता. 16) कार्यालयात आले आणि विनाकारण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करु लागले. फिर्यादीच्या मालकांनी आरोपींना विचारणा केली असता, त्यांनाही अरेरावीची भाषा वापरली. मुख्य दरवाजाजवळ उभारुन आत कोण येतो, ते पाहतो असे म्हणून फिर्यादी व कमचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढले व कार्यालयास कुलूप लावल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
उधारीच्या कारणावरुन आसरा चौकात मारहाण
आसरा चौकातील मथुरा चायनिजच्या गाडीजवळ तिघांनी विशाल सुरेश सरडे (रा.नागेंद्र नगर, कुमठा नाका) यांना मारहाण केली. त्यानुसार विशाल सरडे यांनी विजापूर नाका पोलिसांत अविनाश जाधव, गोविंद दत्ता चव्हाण व यांच्या साथीदाराविरुध्द विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचा मित्र गणेश दुस्सा याच्यासोबत उधारीच्या कारणावरुन आरोपींचे भांडण सुरु होते. भांडण सोडवायला गेल्यानंतर आरोपींनी माझ्यासह मित्र सुरेश रच्चा यालाही लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शांतीनगरात आरोपीने पेटविली दुचाकी
शांती नगरातील देवराज शाळेसमोर राहणाऱ्या अंजुम रशीद शेख यांनी घरासमोर दुचाकी लावली होती. सोमवारी (ता. 16) रात्री पावणेबाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवून दिल्याची फिर्याद अंजुम शेख यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.
शांती नगरात राहणाऱ्या अंजुम शेख यांनी घरासमोर नेहमीप्रमाणे दुचाकी (एमएच- 13, सीझेड- 8916) लावली होती. सोमवारी मध्यरात्री अनोळखी व्यक्तीने कोणत्यातरी पेट घेणाऱ्या पदार्थाच्या सहायाने गाडीस आग लावून दिली. त्यामध्ये दुचाकीचे नुकसान झाल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. भोई तपास करीत आहेत.
प्रॉपर्टीच्या व्यवहारातून सात जणांकडून मारहाण
एव्हरग्रीन अर्पाटमेंट, रहिमतुल्लाट नागाळा पार्क, कोल्हापूर येथील इरफान रहिमतुल्ला तांबोळी यांच्या सासरच्या प्रॉपर्टी बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री न केल्याच्या कारणावरुन सातजणांनी मारहाण केल्याची फिर्याद इरफान तांबोळी यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी इरफान तांबोळी यांच्या सासऱ्याची सोलापूर व पिंजरवाडी येथे प्रॉपर्टी आहे. ती मालमत्ता बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री न केल्याने आरोपी आरिफ मर्चंट, शोएब बागवान, तन्वीर बागवान, अल्ताफ बागवान यांच्यासह अन्य तिघांनी मारहाण केली. जबरदस्तीने उचलून घेऊन जावून निर्जनस्थळी डांबून ठेवले. शिवीगाळ व दमदाटी करुन लाकडी बांबूने मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.