उन्हाळी सुट्टी, मामाचा गाव अन्‌ बरेच काही; चिमुकल्या बालगोपाळांची धमालमस्ती हरवली

lost the fun of summer vacation for kids
lost the fun of summer vacation for kids

महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) : 1 मेला परीक्षेचा निकाल लागला म्हणजे सर्वच बालकांना ओढ लागते ती मामाच्या गावाला जाण्याची. मामाचा गाव म्हणजे भाचेमंडळीचा स्वर्ग.... वर्षभरातील अभ्यासाचे ओझे विसरून सुटीचा मनमुराद आनंद लुटायचा आणि पुढील शैक्षणिक प्रक्रियेसाठी तयार व्हायचे. अनेक पिढ्यांनी हा आनंद लुटला. परंतु, यंदा कोरोनाने मामाच्या गावाला नो एन्ट्री असल्याने चिमुकल्यांना मामाचा गाव पोरका झाला आहे. तर घरातच बसावे लागत असल्याने बालपणीचे मैदानावरचे खेळ बंद आहेत. 
प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपल्या की मुलांना उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागायचे. मुलांच्या बालाविश्‍वाचे वर्णन करताना आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर म्हणतात की, झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया... या बालगीततून गदिमांनी मुलांची निरागसता, नातेसंबंध, सुटीची धमाल याचे वर्णन केले आहे. चालू वर्षी मात्र कोरोना असल्याने अचानक शाळा बंद केल्या. परीक्षा रद्द झाल्या आणि शिक्षणमंत्र्यांनी सर्वांना एका आदेशाने पास केले. त्यामुळे संपले निकालाचे आकर्षण, श्रमपरिहार करणारे मामाच्या गावाचे आपलेपण. मामाच्या गावाला जाऊन काय काय मजा करायची याचे चित्र रंगवणारी बालमने हिरमुसली आहेत. कोरोनाने देशात लॉकडाउन करून कडक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. कोरोना संसर्गाने देश ढवळून निघाल्याने चिमुकल्यांच्या मनाने धास्ती घेतलेली दिसून येत आहे. सुटीतील सर्व मनोरथे हरवल्याचे चित्र जाणवत आहे. 
मामाचा गाव आधुनिक झाला. वाड्याच्या जागी इमारती आल्या. काळानुरूप अनेक बदल झाले, म्हणून सुटीच्या दिवसात मामाकडे जाण्याचे आकर्षण मात्र अजूनही कमी झाले नाही. सुटीच्या पहिल्या दिवशी मामाचा गाव गाठायचा व मनसोक्त बागडणं, रानोमाळ भटकत फिरणे. कैऱ्या, बोरं, फणस, करवंद या गावरान मेव्यावर ताव मारणे. भातुकलीच्या खेळात रमणे. दिवसभर उन्हात उनाड पाखरासारखे फिरणे. बैलगाडीत बसून शिवारात फेरफटका घालणे. विहिरीत, नदीत मनसोक्त डुंबणे आणि सकाळ-संध्याकाळ रस-पोळीचा अस्वाद घेणे असे हे मंतरलेले दिवस. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरणपूरक वातावरणात राहणं हे पण नशीबच आहे. उन्हाळा सुटीत पोहण्यासाठी पाणी असणे हे समृद्धीचे लक्षण आहे. नैसर्गिकरीत्या पाडाला आलेली फळे चाखायला मिळणे म्हणजे नशीबवान आहे. कवी शिवाजी बंडगर त्यांच्या फुले फुलताना या काव्यसंग्रहात मामाच्या गावी झुळझुळ झरे, पाण्यात खेळण्या वाटते बरे.. असे म्हणतात. उन्हाळा सुटीत मुले परिसरात रममाण होतात आणि त्यांचे अनोपचारिक शिक्षण होते. 

रात्रीच्या वेळी अंगणात चांदण्याच्या मंद प्रकाशात बसून आजीकडून गोष्टी ऐकण्यात वेगळीच मजा असायची. आजीची एक गोष्ट म्हणजे चार दिवस चालायची. कारण, चांदण्यांकडे बघत झोप कधी लागायची, हेच कळायचे नाही. आजी-आजोबाकडून म्हणी, उखाणे, श्‍लोक, कथा शिकवले जायचे. तसेच मित्र-मैत्रिणी गोळा करून गाण्याच्या भेंड्या खेळत असत. तसेच आजीने भरवलेला प्रेमाचा घास आजच्या पिझ्झा, बर्गरपेक्षा कितीतरी गोड लागतो. त्या हाताची सर आजघडीला कोणालाही नक्कीच नाही. 

उन्हाळा सुटीत गावोगावी गप्पांगण, पोहणे, अंगतपंगत, लग्नकार्य, जत्रा, यात्रा सगळ्यांची मौजमजा असते. लहान मुलांच्या गोड स्वभावाने मोठ्यांचा अबोला निघून जातो. लहानग्यांचे कौतुक केल्याने दोन व्यक्ती, कुटुंबे, समाज यांच्यातील कटुता दूर होते. लहान मुले म्हणजे कुटुंब व समाज यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सुटीतील त्याच्या वावरण्याने एक वेगळीच मौज मजा येते. एका विषाणूने ही मौज घालवली आहे. यावर कवी ज्ञानेश डोंगरे म्हणतात की, देवा तू धावं र-आम्हाला पाव र, दाखव लवकर तु आमच्या मामाचा गावं र, संपव तु कोरोनाला घालुनीया घाव र.. ते दिवस पुन्हा यावेत. ते बालपण पुन्हा भोगायला मिळावे. हीच कदाचित त्या बालगोपाळांची, माहेरवाशीण महिलांची आणि गाव दुरावलेल्या सग्यासोयऱ्यांची इच्छा दिवाळी सुटीत तरी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com