esakal | मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

बोलून बातमी शोधा

Aba Lavte

मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : "माझ्यासमोर निश्‍चित असं कोणतेच ध्येय नव्हते. परंतु, परिस्थितीने लहानपणापासून दिलेले चटके, हलाखीची कुटुंबाची असणारी परिस्थिती कशी बदलावी, त्यात सुधारणा व्हावी हेच माझे मुख्य ध्येय होते. हे करत असताना परिस्थितीने लढण्याचे बळ दिले, त्यामुळेच मला आज उज्ज्वल यश मिळाले आहे. मला माझ्या यशाच्या आनंदापेक्षा आता आई-वडिलांना सुख मिळणार, हाच माझा खरा मोठा आनंद आहे.' सांगोला तालुक्‍यातील लोटेवाडीचा मेंढपाळपुत्र, आबा लवटे यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या आयईएस परीक्षेत देशात 21 वा आला आहे. या वेळी त्याने आपल्या भावना "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.

पहिली ते सातवीपर्यंत मेंढरांमागं फिरणाऱ्या आबा लवटे याने देश पातळीवरील या परीक्षेत थेट 21 वा आला आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर मात करत आबाने आकाशाला गवसणी घालणारे हे यश मिळवले आहे. शेळ्या- मेंढ्या राखण्यापासून ते ऊसतोड करण्यापर्यंत अनेक अंगमेहनतीची आणि कष्टाची कामं करत आबा लवटे हा आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरला आहे.

हेही वाचा: 34 कोरोना रुग्णांवर गुन्हा दाखल ! पॉझिटिव्ह असूनही क्वारंटाइन न होता फिरत होते बिनधास्त

आबा लवटे याचे वडील सुबराव लवटे मेंढपाळ तर आई हौसाबाई घरकाम करते आणि इतर वेळात शेतमळ्यातली कामं तिच्या नशिबी असतात. लहानपणी आबाच्या नशिबी सतत भटकंती होती. कारण, वडील मेंढरं राखायचे, आईसुद्धा मेंढरांमागं असायची. त्यामुळे आपसूकच आबालाही आपल्या लहान भावंडांसह मेंढरांमागं राहावं लागायचं. आबाचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत लोटेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. आई- वडील ऊसतोडीही करायचे. त्यामुळे आबाला सहा महिने आई- वडिलांसोबत ऊसतोडी करण्यासाठी जावे लागायचे आणि राहिलेल्या काळात जमेल तशी शाळा शिकायची, असा त्याच्या प्राथमिक शाळेचा प्रवास होता.

त्यानंतर पाचवी ते दहावी न्यू इंग्लिश स्कूल, लोटेवाडी या शाळेत शिक्षण झाले. दहावीच्या परीक्षेत आबाला तब्बल 73.53 टक्के मार्क्‍स मिळाले. आबाला महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज लोटेवाडी ते आटपाडी असा 12 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करावा लागत असे. बारावी सायन्सला आबाला 71 टक्के मार्क्‍स मिळाले. या मार्कांच्या जोरावर आबाने बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बीई)साठी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आष्टा येथे प्रवेश घेतला आणि अभ्यासात स्वतःला झोकून दिले. विशेष म्हणजे, आबाने या ठिकाणीही आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची चमक दाखवत इंजिनिअरिंगच्या या चारही वर्षात वर्गात सर्वप्रथम येण्याची किमया केली.

हेही वाचा: तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सीटी स्कॅनमधील स्कोअरवरून असे होते निदान

शेवटच्या वर्षी गेट परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र पहिलाच प्रयत्न असल्याने तो केवळ पास झाला, चांगले मार्क्‍स मिळाले नाहीत. त्यानंतर आबाला स्पर्धा परीक्षांची गोडी वाटू लागली. या परीक्षांची त्याने माहिती घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये इंजिनिअरिंगमधील सर्वात मोठी पोस्ट म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, अर्थातच आयईएस असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे अभियांत्रिकी विभागाशी संबंधित अनेक खात्यांमध्ये नोकरीची संधी मिळते. आबा 2020 ची आयईएसची पूर्वपरीक्षा पास झाला; परंतु मुख्य परीक्षेची तारीख जवळ येत असतानाच लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे हा विषय रखडला. त्यामुळे 2020 मध्ये घरीच राहून पुढील परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दरम्यान डिसेंबर 2020 मध्ये बीएआरसीचा (भाभा अणुसंशोधन केंद्र) इंटरव्ह्यू झाला आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून इलेक्‍ट्रिक इंजिनिअरमधून आबा लवटे याची एकट्याचीच निवड झाली. 12 एप्रिल 2021 ला आयईएसच्या लागलेल्या यादीत आबा 21 व्या रॅंकने उत्तीर्ण झाला. लहानपणी मेंढरं राखताना जे स्वप्न बघितलं होतं, आई- वडिलांचे नाव करायचे, गावाचे नाव करायचे, स्वतःचे कर्तृत्व जगासमोर सिद्ध करायचे ते स्वप्न या यादीत नाव आल्यामुळे खऱ्या अर्थाने साकार झाले होते. या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

घरच्या परिस्थितीची व आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर कोणतेही ध्येय उद्दिष्ट साध्य होतच असते. माझे ध्येय फक्त माझी घरची परिस्थिती बदलणे हेच होते आणि ती मी बदलतोय, एवढाच आनंद आहे. प्रत्येकाने परिस्थितीची जाणीव ठेवून आपले कर्तव्य करावे

- आबा लवटे