
मोहोळ : मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाइकांनी मुलासह त्याच्या आईला व अन्य नातेवाईक अशा चौघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता ७) रोजी नालबंदवाडी (ता. मोहोळ) येथे घडली. दरम्यान या २१ जणांपैकी शंकर हनुमंत गुंड, महादेव सुग्रीव गुंड, राहुल अशोक चव्हाण, रोहिदास पोपट माने, सचिन पोपट दांडगे, सज्जन हनुमंत माने व मोहन बबन गुंड या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.