काँग्रेसच्या साठेंना माढ्यात विरोधी नेतृत्वाची संधी; एकमेकांचे कट्टर विरोधक आमदार शिंदे, प्रा. शिवाजी सावंत महायुतीत एकत्र

माढा विधानसभेतील हे तगडे विरोधक एकत्र असल्याने आता विरोधी गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
madha lok sabha congress dhanaji sathe mla shivaji sawant mahayuti politics
madha lok sabha congress dhanaji sathe mla shivaji sawant mahayuti politicsSakal

माढा/उपळाई बुद्रूक : माढा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीतून विधानसभेची जोरात तयारी सुरू असून, माढ्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेना शिंदे गटाचे प्रा. शिवाजी सावंत हे महायुतीचे घटक असल्याने एकत्र आहेत.

माढा विधानसभेतील हे तगडे विरोधक एकत्र असल्याने आता विरोधी गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरून काढण्याची संधी आता काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे, दादासाहेब साठे, नगराध्यक्ष ॲड. मीनल साठे यांना उपलब्ध झाली आहे.

मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत माढा लोकसभेसाठी उतरल्याने, तालुकानिहाय सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र तर एकत्र असलेले विरोधक झाले आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे प्रा. शिवाजी सावंत यांचे राजकीय हाडवैर जिल्ह्याला सर्वश्रुत आहेच. पण दोघेही महायुतीचे घटक पक्ष असल्याने यांच्या विरोधात विधानसभा मतदारसंघात नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असले तरी सबंध विधासभेच्याबाबत नेतृत्वाची पोकळी सध्या माढा तालुक्यात निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ तसा पुरोगामी विचारांशी नाते जोपासणारा व काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार शिंदेंच्या विरोधात तगडे आव्हान उभे करायचे झाल्यास साठे कुटुंबीयांकडे पाहिले जाऊ शकते.

पूर्वीपासून तालुकाभर साठे व शिंदे यांच्याकडेच कार्यकर्त्यांचे जाळे आहे. सहकारात या दोघांचेच चालते. गावोगावच्या ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्या या ठिकाणी या दोघांचेच वर्चस्व. अलीकडे मात्र शिंदेंचे नेतृत्व मोठे होत गेले.

आघाडीधर्माचे पालन करण्यामुळे साठेंची घुसमट सुरू झाली. २००९ नंतर तालुक्यात शिंदे- साठे एकत्र आल्याचा शिंदेंना फायदा तर साठेंना राजकीय तोटा झाला. आता मात्र पुन्हा राजकीय परिस्थिती बदलली असून साठेंकडे शिंदेंचे तगडे विरोधक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.

कारण, साठे कुटुंबीयांकडे दोन वेळा आमदारकी राहिलेली आहे. तसेच काँग्रेसच्या विचाराशी ते एकनिष्ठ असून, आतापर्यंत पक्षाने दिलेला आदेश पाळत आघाडीचे असो की आताच्या महाविकास आघाडीचे काम पक्षनिष्ठा म्हणून करत आले आहेत.

तसेच सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी. कुर्मदास कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा केलेला प्रयत्न व अॅड. मीनल साठे यांनी दोन वेळा माढा नगरपंचायतीची काबीज केलेली सत्ता. त्यांनी महिलांच्या माध्यमातून तालुकाभर उभारलेले संघटन, साठेंच्या नावाला असलेले वलय. या सर्व बाबींचा विचार करता आता साठेंना विरोधी नेतृत्वाची मोठी संधी उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.

साठे गटाने फुंकले रणशिंग

आमदार बबनराव शिंदे अजित पवार गटात गेल्याने सध्या शरदचंद्र पवार गटात नेतृत्वाच्या संधीला वाव आहे. त्यामुळे अनेक नेतेमंडळी पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. परंतु ते त्या-त्या भागापुरते मर्यादित असल्याने साठे गटाने आता विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दादासाहेब साठे व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी तालुकाभर दौरे सुरू केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com