संस्कृती व गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे पंढरपुरातील होळकर आणि शिंदे सरकारांचे भव्य वाडे !

Holkar Wada
Holkar Wada

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर होळकर आणि शिंदे सरकारांचे वैशिष्ट्यपूर्ण वाडे आपली संस्कृती आणि गौरवशाली परंपरेची साक्ष देत आजही मोठ्या दिमाखात उभे आहेत. या दोन्ही वाड्यांची वास्तुरचना आणि भव्यतेवरून मराठेशाहीतील वैभवाची झलक दिसून येते. आता काळानुरूप दोन्ही वास्तूंची डागडुजी करणे आवश्‍यक झालंय. गेल्या काही वर्षांत धार्मिक पर्यटन वाढत असताना शहरातील अशा पुरातन वास्तूंचे जतन आणि उत्तम देखभाल होणे गरजेचे आहे. 

पंढरपुरात आल्यानंतर वारकरी भाविक चंद्रभागा नदीत स्नानासाठी आवर्जून जातात. तेथून महाद्वार घाटावरून श्री विठ्ठल मंदिराकडे जावे लागते. महाद्वार घाटाच्या एका बाजूला होळकर तर दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारचा वाडा आहे. होळकर वाडा सुमारे 254 वर्षांपूर्वी तर शिंदे सरकारचा वाडा 172 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. श्री पुंडलिक मंदिराकडून महाद्वार घाटाकडे पाहिले की या दोन्ही वाड्यांची भव्यता नजरेत भरते. 

पंढरपुरात अनेक मठ आणि धर्मशाळा आहेत; परंतु त्यातील होळकर आणि शिंदे सरकार या दोन्ही वाड्यांची रचना वास्तुशास्त्राचे अप्रतिम नमुने म्हणावेत असे आहेत. श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरापासून चालत अवघ्या पाच मिनिटांत या दोन्ही वाड्यांत जाता येते. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लोकांची सोय व्हावी यासाठी सुमारे सोळाशे वाडे बांधले, त्यापैकी एक असलेला पंढरपुरातील वाडा आजही प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांच्या नियंत्रणाखाली 1754 मध्ये वाड्याच्या पायाभरणी कामाला प्रारंभ झाला होता. सुमारे तेरा वर्षे या भव्य वाड्याचे काम सुरू होते. वाड्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली सागवान लाकडे मध्य प्रदेशमधील जंगलातून आणण्यात आली होती. ही लाकडे नर्मदा नदीत टाकून ती गुजरातमध्ये समुद्रात आणून तेथून ती समुद्रातून रत्नागिरीजवळ आणत. तिथे ती पाण्यातून बाहेर काढून हत्तींच्या पाठीवर टाकून पंढरपुरात आणली गेली. वाड्याचा वास्तुशांती समारंभ 1767 च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला (पाडवा) झाला. पूर्वीच्या काळी अशा मोठ्या वाड्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या वाड्यांच्या भिंतीवरून हत्ती चालवले जात. त्याच पद्धतीने या वाड्यावरून हत्ती फिरवण्यात आले होते, असे सांगितले जाते. 

मराठेशाहीतील श्रीमंतीची झलक दाखवणारा हा भव्य वाडा सुमारे दोन एकर जागेवर उभा आहे. वाड्याची आतील रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण 125 लाकडी खणांचा हा वाडा आहे. पश्‍चिमेकडील दरवाजातून लोकांना वाड्यात प्रवेश करता येतो. वाड्यात दोन भव्य चौक असून, पूर्वेकडील दरवाजातून चंद्रभागा नदीकडे जाता येते. पूर्वी तिथे स्वयंपाकघर, गोशाळा, घोड्याची पागा होती. तर विठुरायासाठी आणि श्रीरामासाठी म्हणून तुळशीबागही होती. 

वाड्याचे बांधकाम सुरू असताना वाड्यात श्री महादेवाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु खोदकाम सुरू असताना तिथे मारुतीची प्राचीन मूर्ती सापडली होती. याविषयीची माहिती माता अहिल्यादेवींना समजल्यावर त्यांनी तिथे श्रीराम मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानुसार वाड्यात अतिशय सुंदर श्रीराम मंदिर बांधण्यात आले. 

वाड्याच्या दक्षिणेला दगडी दोन मंडपांचे श्रीराम मंदिर आहे. त्यामध्ये उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या संगमरवरी मूर्ती आहेत. पूर्वेला दास हनुमानाची मूर्ती आहे. सबंध हिंदुस्थानात कोठेही नसणारी माता अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती येथे श्रीरामासमोर बसवलेली आहे. या मूर्तीची स्थापना होळकरांचे पुढील वारस काशीराव दादा होळकर यांनी केली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून या वाड्याच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. वाड्याच्या काही भागांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते हे लक्षात घेऊन मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम श्री. फत्तेपूरकर यांनी करून घेतले आहे. 

शिंदे सरकार वाडा 
चंद्रभागा नदीच्या तीरावरील महाद्वार घाट चढून वर आले की डाव्या बाजूला शिंदे सरकारचा दगडी भव्य आणि भक्कम वाडा आहे. या वाड्याच्या दर्शनी भागात उभे राहिले की दिसते वाड्यातील श्री द्वारकाधीश अर्थात श्रीकृष्ण मंदिर. तिथे चोवीस खांबांवर उभारलेला सभामंडप असून त्यावरील छत देखील दगडी छावण्यांचेच आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर चांदीचे सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. आतमध्ये उत्तर भारतीय शैलीतील चांदीने मढवलेली छत्री असून तिथे भगवान श्री कृष्णाची चतुर्भुज मूर्ती आहे. त्याशेजारी राधा आणि सत्यभामा यांच्या सुरेख मूर्ती आहेत. उजवीकडे बायजाबाई शिंदे यांची पूजामुद्रेतील दोन फुटी मूर्ती आहे. या ठिकाणी असलेल्या मंडपात महादजी शिंदे यांच्यापासून ते विद्यमान ज्योतिरादित्य शिंदे यांची राजपोषाखातील छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. 

श्रीमंत दौलतराव शिंदे यांच्या दानशूर पत्नी बायजाबाई शिंदे यांनी 1849 मध्ये श्री द्वारकाधीश मंदिर आणि 125 खणांचा भव्य वाडा बांधला. मंदिराच्या चारही बाजूला भक्तांना राहता यावे यासाठी ओवऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्याकाळी वाडा आणि त्यातील मंदिरासाठी मिळून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च झाला. मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी स्वतः बायजाबाई हजर होत्या. 

वाड्याच्या पूर्वेकडील दरवाजातून नदीकडे उतरता येते. पूर्वी तिथे घोडे, हत्ती बांधले जात. वाड्याच्या पश्‍चिम बाजूच्या दरवाजाकडे आता मेवा- मिठाई संघाचा कारखाना आहे. वाड्याची पूर्वीसारखी देखभाल शक्‍य होत नाही. वाड्याची काही ठिकाणी पडझड झाली होती. शिंदे घराण्याच्या विद्यमान वंशजांनी मध्यंतरी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. 

पूर्वी शहरात मंगल कार्यालये फारशी नव्हती. त्यामुळे होळकर आणि शिंदे सरकार वाड्यांचा वापर मंगल कार्यांसाठी प्राधान्याने केला जात असे. अलीकडच्या काळात "छोटी मॉं' या हिंदी मालिकेचे तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावरील मराठी मालिकेचे चित्रीकरण या वाड्यामध्ये करण्यात आले होते. 

प्राचीन पंढरपूरचे अभ्यासक ऍड. आशुतोष बडवे यांना विचारले असता ते म्हणाले, शिंदे घराण्याचे आणि पंढरपूरचे विशेष नाते आहे. उत्तर हिंदुस्थानवर आपला धाक बसवणारे महादजी शिंदे पंढरीचे वारकरी होते. त्यांनी पूज्य मलाप्पा वासकर यांच्याकडून वारकरी संप्रदायाची माळ घातली होती. त्यामुळेच शिंदे घराण्यात विठ्ठलभक्ती परंपरेने चालू आहे. सबंध हिंदुस्थानात कोठेही नसणारी माता अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती होळकर वाड्यातील श्रीराम मंदिरात बसवलेली आहे. या मूर्तीची स्थापना होळकरांचे पुढील वारस काशीराव दादा होळकर यांनी केली आहे. प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणारे होळकर आणि शिंदे सरकारांच्या वाड्यांचे जतन होणे आवश्‍यक आहे. 

प्राचीन पंढरपूरचे अभ्यासक ऍड. धनंजय रानडे यांना विचारले असता ते म्हणाले, होळकर आणि शिंदे सरकारांचे वाडे हे पंढरपूरचे वैभव आहे. श्री विठ्ठल - रुक्‍मिणीच्या दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना या वाड्यांविषयी माहिती सांगून त्यांनी हे वाडे पाहण्यासाठी आवर्जून यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. 

होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, वाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षी श्रावण महिन्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी ह्या या वाड्यात मुक्कामास होत्या. याची नोंद दफ्तरी आहे. वाड्याच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असून त्यासाठी संबंधितांनी (9890577977) वर संपर्क साधावा, असे आवाहन आदित्य फत्तेपूरकर यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com