esakal | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा! कान्होपात्रा वृक्षाचेही रोपण
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक महापूजा!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक महापूजा!

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय 66) यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. महापूजेच्या नंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. ठाकरे, सौ. ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Tourism and Environment Minister Aditya Thackeray), पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharne) आदी उपस्थित होते. (Maha Puja of Shri Vitthal-Rukmini was performed by Chief Minister Uddhav Thackeray-ssd73)

हेही वाचा: आषाढी वारी : दशमीदिवशी वारकरी व भाविकांविना सुनेसुने झाले पंढरपूर!

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. सत्काराप्रसंगी प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police Manoj Lohia), जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar), जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (District Superintendent of Police Tejaswi Satpute), प्रांत अधिकारी सचिन ढोले तसेच श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

गेली सुमारे तीस वर्षे श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे एकाच प्रकारचे फोटो समितीकडून विक्रीसाठी उपलब्ध होत होते. अलीकडेच मंदिर समितीने श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचे मनमोहक पोषाखातील आणि अलंकारातील वेगवेगळ्या आकारातील फोटो विक्रीसाठी तयार केले आहेत. त्या फोटोंचे अनावरण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरातील संत कान्होपात्रा मंदिराजवळील वृक्ष वठला होता. तिथे श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा नव्याने रोपणही करण्यात आले.

हेही वाचा: आम्हाला सर्दी, पडसं अन्‌ खोकला काहीही त्रास नाही !

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला आकर्षक पोषाख...

आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाची एक प्रकारे दिवाळीच असते. या वेळी विठुरायाला आणि श्री रुक्‍मिणीमातेला घालण्यासाठी खास बंगळूर येथून आकर्षक रेशमी पोषाख आणण्यात आला होता. विठुरायाला गुलाबी रंगाचे सोवळे, शेला आणि मोती रंगाचा अंगरखा घालण्यात आला तर श्री रुक्‍मिणी मातेस गुलाबी रंगाची भरजरी रेशमी साडी नेसवण्यात आली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्‍मिणीमातेचे रूप अधिकच खुलून दिसू लागले.

मानाचे वारकरी केशव कोलते

पूर्वी दर्शनाच्या रांगेतील एका दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या समवेत महापूजा करण्याचा मान दिला जात असे. परंतु कोरोनाच्या सावटामुळे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरातील वीणेकरी लोकांमधून चिठ्ठी टाकून त्या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान दिला जातो. केशव कोलते (वय 71) हे गेल्या वीस वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देण्याचे काम करत आहेत. ते मूळचे संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे, वर्धा येथील रहिवासी आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली असून, मंदिरावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पंढरपूर शहर सुनेसुने...

आषाढी यात्रेसाठी दरवर्षी सुमारे दहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची गर्दी होत असते. यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी आल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे, हे लक्षात घेऊन शासनाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकरी भक्तांच्या विना आषाढीचा सोहळा होत आहे. ऐन यात्राकाळात पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात्रेत वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाणारे रस्ते आज आषाढी एकादशी दिवशी निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. चंद्रभागेच्या काठावर लाखो वारकरी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी दाटी करतात, ते चंद्रभागेचे वाळवंट देखील आज भाविकांच्या विना सुनेसुने आहे.

loading image