
Mangalwedha : नगरपालिकेला नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी 26.14 कोटीचा निधी - आ. आवताडे
मंगळवेढा - स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत 29 नागरी मंगळवेढा नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 26 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.
शहरातील नागरिकांच्या मूलभूत आणि पायाभूत सोयी - सुविधांच्या पूर्ततेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठी चालना मिळणार आहे. नागरी हद्दीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घनकचरा व स्वच्छता विषयी असणाऱ्या इतर समस्या आणि अडी -अडचणी मार्गी लावण्यासाठी तसेच शहर भागातील स्वच्छता संकल्पनेस अधिकतम पद्धतीने गतिमान करण्यासाठी या निधीचा शहरवासीयांना खूप मोठा फायदा होणार आहे.
उपलब्ध निधीमार्फत शहरामध्ये गोळा होणारा घनकचरा एकत्रित करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीची साधनसामुग्री खरेदी करणे, गोळा झालेल्या कचऱ्याचे विभाजन करून त्यावर प्रक्रिया करणे व पुनर्वापरासाठी त्या कचऱ्यावर विविध प्रक्रिया करणे. नियोजित प्रक्रिया करण्यासाठी कचऱ्याच्या घनतेनुसार व आकारानुसार कचरा शेड यांची उभारणी करणे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहराच्या विविध भागांत पाणी प्रवाहाच्या अडचणीमुळे साठणाऱ्या पाण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या गटारांची बांधणी करून निर्मिती करणे व दूषित पाणी शहर हद्दीबाहेर जाण्यासाठी उपाययोजना करणे. पाण्याची बचत ही काळाची गरज या अभियानानुसार पावसाच्या पाणी जमिनीमध्ये जिरविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खड्डे बांधणे.
शहराच्या निरनिराळ्या भागामध्ये आशा खड्ड्यांची निर्मिती केल्याने मुबलक प्रमाणात पावसामुळे पडणारे पाणी आवश्यक ठिकाणी थांबवणे सोयीचे होणार आहे. शहर हद्दीतील नागरिकांसाठी आ.आवताडे यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला.
राजकीय उदासीनतेमुळे शहर विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर गेले.परंतु केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ घेत आ. आवताडे यांनी निधी उपलब्ध केल्यामुळे शहराचा कायापालट होण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल.
- आदित्य हिन्दुस्तानी, मंगळवेढा