esakal | महापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

Barshi pool.

बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने भोगावती, निलकंठा, नागझरी नदीला महापूर आला. त्यामुळे नदीपात्रातील पुलांची दुरवस्था झाली आहे. अशातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. 

महापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू 

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने भोगावती, निलकंठा, नागझरी नदीला महापूर आला. त्यामुळे नदीपात्रातील पुलांची दुरवस्था झाली आहे. अशातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. 

मळेगाव परिसरातील मळेगाव- हिंगणी - वैराग गावांना जोडणाऱ्या भोगावती नदीवरील 50 वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचा भाग महापुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक व जनजीवन ठप्प झाले आहे. हिंगणी येथील दगडी पूल अनेकवेळा भोगावती नदीला महापूर आल्याने पाण्याखाली गेला मात्र 14 ऑक्‍टोबरच्या महापुरात पुलाचा भाग उद्‌ध्वस्त झाला आहे. तसेच साकत - ढाळे पिंपळगाव - मळेगाव गावांना जोडणारा ढाळे पिंपळगाव येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. निलकंठा नदीच्या पात्रातील पुलावरील स्लॅब वाहून गेल्याने लोखंडी गज उघडे पडले आहेत. पुलावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातूनच नागरिक जीवघेणा प्रवास करीत आहेत. 

जामगाव - उस्मानाबाद, उपळे-उस्मानाबाद, मळेगाव-गौडगाव, मळेगाव-बार्शी रस्त्यावरील पूल पुराच्या प्रवाहात कमकुवत झाले आहेत. तसेच रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे अशी अवस्था मळेगाव परिसरातील रस्त्यांची झाली आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेत ढासळलेल्या पुलाची व खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

50 वर्षांपूर्वी बांधलेला भोगावती नदीवरील दगडी पूल 
भोगावती नदीला महापूर आल्याने कमकुवत झाला आहे. पुलाचा भाग वाहून गेल्याने व मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो आहे. संबंधित विभागाने वेळीच दखल घेत भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी पुलाची दुरुस्ती करावी व नागरिकांना होणारा नाहक त्रास टाळावा. 
- सुभाष शेळके, डीसीसी संचालक, हिंगणी (पा) 

ढाळे पिंपळगाव येथील निलकंठा नदीवरील पूल पुराच्या तडाख्यात कमकुवत झाला आहे. पाण्याच्या प्रवाहात पुलावरील स्लॅब वाहून गेला असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. ढाळे पिंपळगाव प्रकल्पाला लागून असलेला निलकंठा नदीवरील पूल खूपच अरुंद आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवावी. 
- नानासाहेब काळे, माजी सरपंच, ढाळे पिंपळगाव 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top