
सोलापूर - राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान होताच स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांचा सूर आता बदलू लागला आहे. ठाणे, मुंबई आदींसह इतर महापालिकेत शिवसेनेत फूट पडली असली तरी शिंदे गटात जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. सोलापूर महापालिकेत निष्ठावंत शिवसैनिक नसले तरी शहरात शिंदे गटाचा चेहरा कोण, असा प्रश्न पडत आहे.
एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना स्थानिक शिवसैनिकांची नाळ जुळली असली तरी ‘मी उद्धवांसोबत'' म्हणणाऱ्यांना आता सत्ता खुणावत आहे. मात्र, भवितव्य दिसत नसल्याने शिवसेनेच्या चिन्हावर महापालिकेत विविध पदे उपभोगलेली मंडळीदेखील सध्या तरी ‘न्यूट्रल’ झाले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर शिवसेनेची पकड आहे. राज्याच्या राजकारणात कितीही उलथापालथ होवो, पण मुंबईतील महत्त्वाच्या महापालिका व नगरपालिकांवर शिवसेनेची सत्ता कायम आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. या राजकीय खेळीचा परिणाम हा राज्यातील सत्तांतरापुरती मर्यादित राहिली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांमध्येही फूट पडली आहे. महापालिकेतील बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी असलेली नाळ मजबूत करणे अपेक्षित होते; परंतु नगरविकासमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ही समन्वयाची पोकळी भरून काढली. त्यामुळे महपालिका व नगरपालिकांच्या विविध विकासात्मक योजनांसाठी शिवसैनिक, नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांचे कार्यालय गाठत.
या मंत्रिपदाच्या माध्यमातून स्थानिक फळी मजबूत करण्याचे काम गेल्या अडीच वर्षात केले. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी उद्धवांसोबत म्हणणाऱ्यांसह सर्वांनाच सत्ता खुणावू लागली आहे. येत्या सहा महिन्यांत राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आहेत. सोलापूर महापालिकेच्या गतनिवडणुकीत काँग्रेसमधील महेश कोठे यांच्या हाती धनुष्यबाण होते. कार्यकर्त्यांची फळी रुंदावून पक्ष मोठे करण्याऐवजी कोठे यांनी उपऱ्या नेत्यांना पक्षात आणून नगरसेवकांची संख्या वाढविली.
निष्ठावंत शिवसैनिकांचा विरोध झाला, परंतु पक्षश्रेष्ठींसमोर शिवसैनिकांचे काही चालले नाही. कट्टर शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या काही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीत आमदार तानाजी सावंतांची ढाल वापरून कोठेंना पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडले. आज तानाजी सावंत खुद्द शिंदे गटामध्ये सामील आहेत. तर मग विधानसभा निवडणुकीत आमदार सावंतांचा कार्ड वापरणारे तरी त्यांच्यासोबत आहेत का? सोलापुरातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत असतील तर शिंदे गटाचा चेहरा कोण, असा प्रश्न पडत आहे.
मागील निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पाच वर्षात महापालिकेत विविध पदे उपभोगलेले शिवसैनिक हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. सोलापुरातील सच्चा शिवसैनिकांनी ‘मी उद्धवांसोबत’ असे सांगण्यासाठी भली मोठी बैठक रंगविली. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांना सत्ता खुणावत असली तरी सत्तेचे भवितव्य काय? ही भीतीदेखील मनात असल्याने ‘मनी शिंदेशाही, तोंडी उद्धव’ अशी सावध भूमिका शिवसैनिक घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.