कार्तिकी एकादशीनिमित्त सजताहेत पंढरीतील बाजारपेठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pandharpur

कार्तिकी एकादशीनिमित्त सजताहेत पंढरीतील बाजारपेठा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना महामारीमुळे सुमारे दोन वर्षानंतर शासनाने कार्तिकी यात्रेसाठी परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पंढरीतील व्यापाऱ्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली असून व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा: कार्तिकी दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवस बंद राहणार विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन !

यावर्षी 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व पंढरपूर नगरपरिषदने यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गोपाळपूर रस्त्यालगतच्या पत्राशेड दर्शन बारी मध्ये कायमस्वरूपी चार व तात्पुरत्या स्वरूपातील सहा अशा एकूण दहा शेड उभारल्या आहेत. या पत्रा शेड मध्ये सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभे असतात. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता मंदिर समितीने दोन दर्शन बारीतील अंतर वाढवले आहे. याशिवाय दर्शन बारी मध्ये उभे राहणाऱ्या भाविकांना मास्क व सॅनीटायझर चा वापर करणे बंधनकारक केले आहे. अशा प्रकारचे सूचनाफलक पत्रा शेड मध्ये जागोजागी लावण्यात आले आहेत.

हेही वाचा: आळंदीत कार्तिकी एकादशी पहाटपूजा

पत्रा शेड दर्शनबारी परिसरात तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. याशिवाय तेथे एक आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात आले आहे. दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन व्हावे, यासाठी एलसीडी टीव्हीची सोय करण्यात आली आहे.

कार्तिक यात्रेमुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

कोरोना मुळे मागील वर्षी आषाढी व कार्तिकी यात्रा भरली नव्हती. राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षी आषाढी यात्रा देखील प्रतिकात्मक स्वरूपातच झाली. तदनंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जवळपास दोन वर्षांनी शासनाने कार्तिकी यात्रेला परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरेल या आशेवर पंढरीतील प्रासादिक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. पंढरी हळूहळू भाविकांच्या गर्दीने गजबजू लागली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा: संत नामदेव महाराज मंदिरात परतवारी एकादशी निमित्ताने महापूजा

यासंदर्भात येथील ताठे अगरबत्तीचे सागर ताठे-देशमुख म्हणाले, मागील दोन वर्षांपासून कोणतीही यात्रा न भरल्यामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. यंदा मात्र कार्तिकी यात्रेला शासनाने परवानगी दिल्यामुळे यात्रेकाळात अपेक्षित व्यवसाय होईल अशी आशा आहे. दरम्यान ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे यात्रेसाठी राज्यभरातून एसटी बसने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक भाविक खाजगी वाहने व ट्रॅव्हल बसेसच्या माध्यमातून पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने व ट्रॅव्हल बसेस आल्यामुळे पंढरीतील सर्व पार्किंगची ठिकाणे फुल झाली आहेत. त्यामुळे अनेक वाहने प्रमुख रस्त्यांवर पार्किंग केल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे.

loading image
go to top