Solapur News: दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला पडणार महागात? महिला आयोगाचे कारवाईचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News: दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला पडणार महागात? महिला आयोगाचे कारवाईचे आदेश

सोलापुर जिल्ह्यातील अकलूज येथे एक अजब विवाह सोहळा शुक्रवार 2 डिसेंबरला पार पडला होता. या अजब विवाह सोहळ्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. कारण एक वर आणि दोन वधू असा हा लग्नसोहळा पार पडला होता. उच्चशिक्षित दोन जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केलं आहे. हा अनोखा विवाह सोहळा अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे पार पडला आहे. परंतु दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला चांगलच महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. या नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आली आहे.

तर या विवाह सोहळ्याची दखल आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. या घटनेसंबधी चौकशीचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवून द्यावा असा आदेश दिला आहे.

या संदर्भात ट्विट करत रूपाली चाकणकर यांनी म्हंटलं आहे की, "सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा." असा आदेश चाकणकर यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिले आहेत.

हेही वाचा: Solapur News: '...म्हणून जुळ्या बहिणींनी केलं एकाच मुलाशी लग्न'

काय आहे प्रकरण?

मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केलं आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांना लहाणपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींच्या वडिलांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई या तीघी आजारी होत्या. अतुलने त्याच्या टॅक्सीतून त्यांना रुग्णालयात नेले. त्यांची त्याने काळजी घेतली. त्यांनी घेतलेली काळजी आणि दाखवलेला आपलेपणा यामुळे पिंकीला अतुल आवडू लागला. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु या दोघी कधीच वेगळ्या राहिल्या नव्हत्या त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा: Solapur News: दोन जुळ्या बहिणींशी विवाह करणं नवरदेवाला पडणार महागात? पोलीस ठाण्यात NCR दाखल

रिंकी आणि पिंकी या दोघीही इंजिनियर असून त्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचे शिक्षणही एकत्रित झाले आहे. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या आहेत. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत लग्न केले आहे. या अनोख्या विवाहाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत.