esakal | एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी कडक लॉकडाउनचा निर्णय !
sakal

बोलून बातमी शोधा

Farooq Shabdi

एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी कडक लॉकडाउनचा निर्णय !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना (Covid-19) महामारी ही काय आता नवीन राहिलेली नाही. गेल्या एक ते सव्वा वर्षापासून सोलापूर शहर- जिल्ह्यासह संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाला रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउनचा (Lockdown) पर्याय शोधला असल्याचा आरोप एमआयएमचे (MIM) शहराध्यक्ष फारुक शाब्दी (Farooq Shabdi) यांनी केला आहे. या कडक लॉकडॉउनला एमआयएमचा तीव्र विरोध असून, प्रशासनाच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे मतही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केले आहे. (MIM city president Farooq Shabdi has protested the strict lockdown)

सोलापूर शहर व जिल्ह्यातील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाइकांना बेड उपलब्ध होत नाहीत, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध होत नाहीत. कोरोनाच्या महामारीत या मूलभूत सुविधा प्रशासनाकडून अपेक्षित असताना प्रशासन कडक लॉकडाउन करून सर्वसामान्यांना आणखीन संकटात ढकलत आहे. ज्या व्यक्तींचे हातावरचे पोट आहे, अशा व्यक्तींनी काय करायचे? आठ दिवसांचा किराणा, भाजीपाला, फळे, धान्य व अन्नपदार्थ त्यांनी साठवून ठेवायचे का? त्यांच्या एक दिवसाच्या रोजीरोटीचा प्रश्न असताना आठ दिवसांचे धान्य आणायचे कोठून, असा प्रश्नही एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने अगोदर हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करावी, त्यानंतरच कडक लॉकडाउन संदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: शहर-जिल्ह्यात उद्यापासून मेडिकल, बॅंकांशिवाय सर्वकाही बंद !

रमजान ईदनंतर करा कडक लॉकडाउन

शहर काझी मुक्ती अमजदअली काझी यांनी प्रशासनाच्या कडक लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रमजानच्या सुरवातीला शासनाने कडक संचारबंदी जाहीर केली. 13 किंवा 14 मे रोजी रमजान ईद साजरी होण्याची शक्‍यता असताना सोलापूरच्या प्रशासनाने 8 ते 15 मे या कालावधीत कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समस्त मुस्लिम समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. रमजान ईद झाल्यानंतर 15 मे नंतर प्रशासनाने कडक लॉकडाउन करावा. 15 मे पर्यंतच्या लॉकडाउनचा निर्णय रद्द करावा, अशी भूमिका शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी घेतली आहे.