esakal | पालकमंत्री आव्हाड यांचे साकडे : बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर होऊ दे
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad

"मी माझ्या मतावर ठाम आहे' 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच एप्रिल रोजी नऊ मिनिटे वीज बंद करण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या याच आवाहनाचे स्वागत केले आहे. मंत्री आव्हाड आज पंढरपुरात आले असता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत केले आहे असे विचारले असता ते म्हणाले, माझं बोलून झाले आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे.

पालकमंत्री आव्हाड यांचे साकडे : बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर होऊ दे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : बा विठ्ठला, देशावर आणि राज्यातील जनतेवर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. या संकटातून राज्यातील जनतेला सुखरूप बाहेर काढ. ही सर्व तुझीच लेकरे आहेत. तुझ्या लेकरांना आणि सरकारला महामारीच्या संकाटाला तोंड देण्याची शक्ती दे, असे साकडे आपण संत चोखामेळा चरणी घातल्याचे सोलापूरचे पालकमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे सांगितले. 


सोलापूरचे पालकमंत्री म्हणून मंत्री आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर ते शुक्रवारी (ता. 3) प्रथमच पंढरपुरात आले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री आव्हाड यांनी संत नामदेव पायरीपासूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी संत नामदेव पायरी आणि संत चोखामेळा समाधीचे दर्शन घेतले. 


संत चोखामेळा यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला आहे. या संत चोखामेळ्याच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यावर आणि देशावर आलेले कोरोनाचे हे संकट विठ्ठलाने लवकर दूर करावे, असे आपण साकडे घातल्याचे मंत्री आव्हाड यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्स हा ठेवला गेला पाहिजे यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. येथील प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्‍य झाल्याचेही यावेळी मंत्री आव्हाड यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, अमरजित पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे आदी उपस्थित होते.