esakal | सोलापूर विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांचे वाढविले गुण ! रोहित पवार म्हणाले, हा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय 
sakal

बोलून बातमी शोधा

MLA_Rohit_Pawar.

रोहित पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी (ता. 21) सोलापुरात आले होते. तेव्हा विद्यापीठातील गैरप्रकाराबाबत विचारले असता, त्यांनी विद्यापीठातील गैरप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून कडक कारवाई होणार, अशी ग्वाही दिली. 

सोलापूर विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांचे वाढविले गुण ! रोहित पवार म्हणाले, हा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय 

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सोलापूर विद्यापीठामध्ये नेमकं काय घडलं हे बघावं लागेल. जेव्हा एखादी प्रश्‍नपत्रिका आउट होते, तेव्हा ही प्रश्‍नपत्रिका विकत घेणारे विद्यार्थी असतात श्रीमंत वर्गाचे. मात्र सर्वसामान्य व कष्ट करण्याची ताकद आहे, असे गरीब विद्यार्थी मागे पडतात. विद्यापीठ हे ज्ञानपीठ असते, अन्‌ अशा ज्ञानपीठात असे गैरप्रकार घडत असेल तर त्याच्या खोलात जायची गरज आहे. असे गैरकृत्य युवकांना पटणारे नाही. संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी (ता. 21) सोलापुरात आले होते. तेव्हा विद्यापीठातील गैरप्रकाराबाबत विचारले असता, त्यांनी विद्यापीठातील गैरप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून कडक कारवाई होणार, अशी ग्वाही दिली. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरव्यवहार करून गुण वाढविल्याप्रकरणी विद्यापीठाने फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा तपास सायबर पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. सायबर पोलिसांनी या गैरव्यवहाराच्या मुळाशी जाऊन तपास केला. त्यात तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे, तत्कालीन यंत्रणा विश्‍लेषक प्रशांत चोरमले, सुविधा समन्वयक हसन शेख आणि प्रोग्रामर प्रवीण गायकवाड यांना दोषी धरत अटक केली. 

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकार अनेकदा समोर आले आहेत. नापास विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणे, परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखविणे असे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, 25 डिसेंबर 2019 रोजी विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांचे गैरप्रकार करून गुण वाढविल्याची तक्रार पोलिसांत केली. धक्‍कादायक बाब म्हणजे, कुलगुरू परदेशी गेल्यानंतर त्यांचा लॉगइन आयडी व पासर्वड वापरून नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचे समोर आले होते. त्या वेळी विद्यापीठाने एक समिती स्थापन करून प्राथमिक तपास केला होता. त्यानंतर गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाने पोलिसांत धाव घेतली. त्यादरम्यान, डॉ. कोकरे यांनी त्यांच्या पात्रतेची कागदपत्रे अपूर्ण दिल्याने त्यांना पदावरून काढण्यात आले होते. सायबर पोलिसांनी त्यानंतर कसून तपास केला आणि हा गैरप्रकार समोर आला. 

दरम्यान, नापास तथा कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणारी टोळी विद्यापीठात कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे चारही संशयित आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

ज्ञानपीठ असणाऱ्या विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकच या गैरप्रकारात सामील असल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. यावर आमदार रोहित पवार यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

loading image