
करमाळ्यात होतोय आमदार संजय शिंदे गट मजबूत! नारायण पाटील गटाला शह
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात (Karmala Taluka) आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांच्या गटात धूमधडाक्यात एकापाठोपाठ एक प्रवेश सुरू झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाला करमाळा तालुक्यात बळकटी येत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातूनच आमदार शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
हेही वाचा: MPSC : मागणीपत्रासाठी आता डिसेंबरची मुदत! सरसकट वयोमर्यादा वाढ नाहीच
नुकताच देवळालीचे सरपंच व बागल गटाचे खंदे समर्थक, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती कै. कल्याण गायकवाड यांचे चिरंजीव आशिष गायकवाड यांनी आमदार शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश बागल गटासाठी एक इशारा समजला जातो. मात्र बागल गटाने ही घडामोड किती गांभीर्याने घेतली, हे सांगणे कठीण आहे. यापूर्वी माजी आमदार नारायण पाटील समर्थक झरेचे प्रशांत पाटील यांनीही आमदार शिंदे गटात प्रवेश करत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद मिळवले. आमदार संजय शिंदे यांनी करमाळा तालुक्यात आपला गट वाढविण्यावर विशेष भर दिल्याचे यातून दिसून येत आहे. येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, श्री मकाई सहकारी साखर कारखाना, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकांसाठी या प्रवेशाच्या माध्यमातून शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाला शह देण्याचा आमदार शिंदे गटाचा प्रयत्न आहे.
हेही वाचा: जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !
नुकताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे यांनी शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांचा प्रचार केला होता. तेही आमदार शिंदे गटात लवकरच धूमधडाक्यात जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय सर्वाधिक बागल गटाचे कार्यकर्ते आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे शिंदे समर्थक जाहीरपणे सांगत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातही लवकरच बागल गटाच्या एका तगड्या कार्यकर्त्याचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. याबाबत बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि आमदार शिंदे यांचे विश्वासू तानाजी झोळ यांनी या प्रवेशाची चांगलीच वातावरण निर्मिती सुरू केली आहे.
Web Title: Mla Sanjay Shindes Group Is Getting Stronger In Karmala Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..