
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'ईडी' म्हणजे पान-तंबाखूचे दुकान!
सोलापूर : देशात सध्या असुरक्षित वातावरण निर्माण झाले असून, अनेकजण दहशतीखाली वावरत आहेत. काहींनी घाबरून स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) तथा भाजपविरोधात (BJP) बोलणाऱ्यांवर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अनेकांना 'ईडी'ची भीती दाखविली जात आहे. 'ईडी' म्हणजे पान-तंबाखूचे दुकान झाले असून, कोणाच्याही घरात घुसून त्यांना उचलून नेले जात आहे. आज मी त्यांच्या विरोधात बोलत आहे तर उद्या माझ्याही घरात ईडीवाले घुसतील, अशी टीका कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केली.
हेही वाचा: हेल्मेट नसल्यास द्यावा लागणार 'इतका' दंड! हेल्मेट घाला अन् जीव वाचवा
आमागी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एका प्रभागात आयोजित कार्यक्रमात आमदार प्रणिती यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते. आमदार प्रणिती म्हणाल्या, एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे प्रमुख काम भाजपकडून केले जात आहे. बिनकामाचा पक्ष म्हणजे भाजप. या पक्षातील सर्वजण टीका करण्याशिवाय दुसरे काहीच करीत नाहीत. त्यांना लोकहिताचे काहीच देणेघेणे नाही. शेतकऱ्यांना मारणारे, त्यांच्यावर बुलडोझर चालवणारे आज मोकाट फिरत आहेत. दुसरीकडे निर्दोषांना तुरुंगात टाकले जात आहे. या सर्व बाबींमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून तसे षड्यंत्र पंतप्रधान मोदी तथा भाजपकडून केले जात आहे. कॉंग्रेस काळात सर्वजण आनंदी होते, बिनधास्तपणे कोणी कुठेही फिरत होते. परंतु, आज देशाअंतर्गत स्थिती बिघडली असून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. लोक घराबाहेर यायला घाबरत असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.
हेही वाचा: उजनी 110 टक्के! वर्षाचे झाले नियोजन, शेतीसाठी 'यावेळी' सुटणार पाणी
माझ्यावरही होईल "ईडी'ची कारवाई
जनतेच्या भल्यासाठी राजकारण करत असताना विरोधकांवर टीका केली जाते. परंतु, मी भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे उद्या माझ्यावरही 'ईडी'ची कारवाई करून मलाही आत टाकले जाऊ शकते, असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. सत्ता मिळाल्यावर देशाच्या पंतप्रधानात मग्रुरीपणा दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील खालचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीही तसेच असणार. शेतकऱ्यांना चिरडून टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान उद्घाटनासाठी जातात, ही शोकांतिका असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
Web Title: Mla Shinde Criticized The Modi Government Over The Eds Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..