esakal | रेमडेसिव्हीर द्या अन्यथा आंदोलन ! आमदार देशमुखांची डॉ. शिंगणे यांच्याशी चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

vijaykumar deshmukh

रेमडेसिव्हीर द्या अन्यथा आंदोलन ! आमदार देशमुखांची डॉ. शिंगणे यांच्याशी चर्चा

sakal_logo
By
प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी तातडीने रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन्स उपलब्ध करून द्या; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे त्यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनची मागणी केली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा असलेला तुटवडा, इंजेक्‍शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी कसरत आणि आर्थिक लूट याबाबतही आमदार देशमुख मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली केली आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध होत नसलेले बेड आणि सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी आवश्‍यक असलेल्या ऑक्‍सिजनबद्दलही चर्चा झाली. सोलापूरकरांना भेडसावणाऱ्या या प्रश्‍नांवर मंत्री डॉ. शिंगणे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली आहे.

आमदार देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. सोलापुरात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याने सोलापूरचा मृत्यूदर वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी इंजेक्‍शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सात हजार रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले. मुंबई व नागपूरसाठी सुद्धा इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले. सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीतच असा भेदभाव का केला जातो? सोलापूर जिल्ह्याला अशी सापत्नपणाची वागणूक का दिली जाते? सोलापूर जिल्ह्यासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन तातडीने उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करू.

- विजयकुमार देशमुख, आमदार