
स्वस्तात सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून खंडोबाचीवाडी ता. मोहोळ येथील एकाची पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
Mohol Fraud : खरी सोन्याची नाणी देतो असे सांगून एकाची पाच लाखाची फसवणूक
मोहोळ - स्वस्तात सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून खंडोबाचीवाडी ता. मोहोळ येथील एकाची पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार शिवाजी श्रीमंत सुतार (वय 38 रा. खंडोबाचीवाडी, ता. मोहोळ) यांना संशयित संतोष व मुकदम गायकवाड या दोघा साथीदारांनी सोन्याचे एक खरे नाणे दाखवून अन्य नाणी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सुतार हे आमडपूर, ता. चिखली, जिल्हा बुलढाणा येथील आमडापूर गावाशेजारील बल्लाळ देवीच्या बाजूला माळरानावरील रस्त्यावर आले. याठिकाणी संशयितांनी पाच लाखांची रक्कम स्वीकारून सुतार यांना 700 नाणी दिली. नाणी घेऊन सुतार हे मुळ गावी परतले.
या नाण्यांची तपासणी केल्यानंतर ते पिवळ्या धातूची नकली नाणी निघाली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्या नंतर सुतार यांच्या तक्रारीनंतर संतोष व मुकादम गायकवाड यांच्या विरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.