
मोहोळ : सचिन पाटील ठरला चांदीच्या गदेचा मानकरी
मोहोळ: रामहिंगणी ता. मोहोळ येथील ग्रामदैवत श्री रामसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. नजीक पिंपरीचा (ता. मोहोळ) पैलवान सचिन पाटील याने कुर्डुवाडीचा पैलवान अमित सूळ याला घिस्सा डाव मारून आसमान दाखवीत चांदीची गदा व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. हे बक्षीस राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय खताळ यांच्या हस्ते देण्यात आले.
कुस्ती मैदानाचे उद्घाटन पोखरापूरचे धनजी विठोबा, देवाचे पुजारी सोमादेव वाघमोडे व मधूदेव वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दीडशे ते दोनशे लहान मोठ्या पैलवानांनी सहभाग नोंदवला. लांबोटीच्या अक्षय खताळ यांनी तानाजी खताळ यांच्या स्मरणार्थ ठेवलेले प्रथम क्रंमाकाचे बक्षीस ५१ हजार रुपये व चांदीची गदा सचीन पाटील याने कुर्डुवाडीचा नामाकिंत पैलवान अमीत सूळ याला घिस्सा डावावर चितपट करून पटकाविले. द्वितीय क्रंमाकाची कुस्ती संग्राम काकडे (ढोकबाभुळगांव ) व तात्या झुमाळे (पाटकूल) यांच्यात होऊन कुस्ती जोड झाली. रखमाजी खांडेकर व निवृती पाटील यांच्या स्मरणार्थ सोमनाथ खांडेकर मेजर, माजी सरपंच मधुकर पाटील यांच्यावतीने ठेवलेले ३१ हजाराचे बक्षीस विभागून देण्यात आले. तिसऱ्या क्रंमाकाची कुस्ती अंकुश बंडगर (मोहोळ) व हणमंत शिंदे (पाटकूल ) यांच्यामध्ये झाली. ही कुस्तीही जोड झाली.
शिवाजी मासाळ आणि बलभीम काळे यांच्या स्मरणार्थ सुनील बबन वाघमोडे व डॉ. पोपट काळे यांच्याकडून देण्यात आलेले ३१ हजार रूपयांचे बक्षीस दोघांना विभागून देण्यात आले. चौथे कुस्ती अविराज पाटील (न.पिंपरी) व रामा कुंभार यांच्यात होऊन रामा कुंभार विजयी झाले. त्यांना अण्णाराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र उपकेसरी समाधान पाटील यांच्या तर्फे चांदीची गदा व २५ हजार रुपयांचे बक्षीस सरपंच किरण वाघमोडे व भाऊसाहेब वाघमोडे, हणमंत वाघमोडे यांच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी युवा उद्योजक अक्षय खताळ, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील, शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर, महाराष्ट्र उपकेसरी समाधान पाटील, चंद्रकांत धोत्रे आदींसह कुस्ती शौकिन उपस्थित होते. कुस्ती निवेदक म्हणून अशोक धोत्रे यांनी काम पाहिले.
Web Title: Mohol Sachin Patil Standard Bearer Silver Mattress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..