
मोहोळ येथे उबाठा महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत होत्या.
Sushma Andhare : 'भाजपाने माझ्यावर धर्माचे अस्त्र चालविण्याचा प्रयत्न केला, वारकरी अंगावर सोडले'
मोहोळ - आम्हाला पुन्हा त्याच वर्षा वर व विधान भवनावर भगवा फडकविण्याचा आहे. जे लोक शिवसेना संपली म्हणतात त्यांनी या महाप्रबोधन यात्रेची धास्ती घेतली आहे, परंतु शिवसेना संपणार नाही शिवसेनेत अनेक जण आले व गेले पण काहीही फरक पडला नाही, शिवसेनेचे आमदार कुठेही पळाले तरी निष्ठावंत शिवसैनिक जाग्यावरच आहेत. माझा भूतकाळ उकरून मला 'ईडी' लावता येते का याचा प्रयत्न झाला पण काही उपयोग झाला नाही. हिंदू खतरेमे है म्हणत भाजपाने वारकरी माझ्या अंगावर सोडले व धर्माचे अस्त्र चालवण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन "उबाठा" शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
सोमवार ता 26 रोजी मोहोळ येथे उबाठा महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत होत्या. श्रीमती अंधारे पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजनांचे राजकारण संपविण्याचे ठरविले आहे, तुमच्या चक्रव्युहात अनेक अभिमन्यू अडकले असतील, परंतु मी माझा अभिमन्यू होऊ देणार नाही. महापुरुषा बद्दल अपशब्द वापरल्यानंतर भाजपाच्या एकाही नेत्याने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा राजीनामा मागितला नाही. मला राज्यपाल पदाबद्दल अभिमान आहे परंतु त्या पदावर बसलेली व्यक्ती आदर करण्याच्या लायकीची नाही. सध्या तरुणांना रोजगार नाही, नोकऱ्याचे दिलेले आश्वासनही पाळले नाही.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजना घाडी म्हणाल्या, मोहोळ मधील शिवसैनिक सतर्क आहेत. आपल्याला 40 गद्दारांचा हिशोब घ्यायचा आहे. निष्ठेशी गद्दारी करू नका असा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, राज्यातील सर्व प्रकल्प बाहेर घालविले .कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मोठे काम केले आहे. कर्जमाफी केली म्हणून मोठे अवडंबर माजविले मात्र कर्जमाफी ही फक्त उद्योगपतींचीच झाली.
मुंबई महापालिकेचे नगरसेवक अनिल कोकीळ म्हणाले, प्रत्येक सभेत उपनेत्या अंधारे यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नांना आजपर्यंत उत्तरे दिली नाहीत. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत व सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूपसला त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कमी केले होते. सध्या सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मोठी सहानभुती असल्याने निवडणुकात अपयशाच्या भीतीने त्यापुढे ढकलल्या जात आहेत.
यावेळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, सीमाताई पाटील, दादा पवार, काका देशमुख, महेश देशमुख, आयोध्या पौळ, रजनी पाटील, बाळासाहेब वाघमोडे, यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे मोहोळचे नेते शहाजहान शेख यांनी श्रीमती अंधारे यांचे स्वागत केले.
यावेळी दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संभाजी शिंदे, विक्रांत काकडे, अशोक भोसले, प्रवीण काकडे, संजय पोळ, शरद कोळी, महेश देशमुख, विकी देशमुख, महादेव गोडसे, सत्यवान देशमुख, राणी गोडसे, नसीमा बोंगे, अनिता सोनटक्के, लखन शिंदे, सचिन जाधव, अजय दासरी, यांच्यासह उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला आदी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.