'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणा देत कर्मचाऱ्यांचा मोहोळ तहासिलवर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Bedase

मोहोळ तालुका पंचायत समितीच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा ने येऊन, घोषणा देत तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिले.

Pension March : 'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणा देत कर्मचाऱ्यांचा मोहोळ तहासिलवर मोर्चा

मोहोळ - 'नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा' यासह अन्य मागण्यासाठी मोहोळ तालुका पंचायत समितीच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा ने येऊन, घोषणा देत तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिले. दरम्यान या मोर्चात महिला ग्रामसेवक, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाने कागदी टोपी परिधान केली होती, त्यावर एका बाजूला 'जुनी पेन्शन लागू करा, अशैक्षणिक कामे रद्द करा' अशी घोषवाक्य लिहिली होती ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

जुनी पेन्शन लागू करा यासाठी मोहोळ तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, कृषी, आदीसह अन्य विभागातील कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी झाले होते. या संपामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला, वृद्ध व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला. त्यांचे आज होणारे काम तरी झाले नाहीच, परंतु वेळ व पैसा वाया गेला. या संपामुळे एरवी प्रचंड गर्दी असणाऱ्या तहसील कार्यालय आवारात शुकशुकाट दिसत होता. त्यामुळे हॉटेल, झेरॉक्स, स्टेशनरी, कापड, फळे व भाजीपाला विक्रेते व्यवसायिकावर याचा मोठा परिणाम दिसून आला. दररोज खरेदी खताच्या कामात व्यस्त असणारे स्टॅम्प व्हेंडर ही निवांत बसून होते.

तहसील, भूमी अभिलेख, सेतू, दुय्यम निबंधक, पुरवठा आदीसह अन्य विभाग ओस पडले होते. या संपाचा बाजारपेठेवर ही परिणाम झाला. अनेक जण ज्यांना संपाची माहिती होती अशांनी मोहोळ ला येणे टाळले, मात्र ग्रामीण भागात तील नागरिकांमधून याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत होती.