मोहोळ : शहरातील राष्ट्रवादीच्या दिग्गजाकडे तालुक्याचे लागले लक्ष

राजकीय हालचालीना वेग आला आहे.
मोहोळ
मोहोळ sakal

मोहोळ : नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक समीप आली असून, राजकीय हालचालीना वेग आला आहे. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे आपणच या प्रभागाचे नगरसेवक होणार या आशेने अनेक उतावीळ नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. नागरिकांची कामे करण्यात ते व्यस्त आहेत. दरम्यान सरकार बदलल्याने राजकीय गणिते कशी जुळणार यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी उपसभापती मानाजी माने यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणूक झाल्यावर नूतन नगरसेवकांची गोळा बेरीज करून राष्ट्रवादीने नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली होती. रमेश बारसकर यांनी मोहोळ शहर विकास आघाडी या नावाने निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश प्राप्त झाले होते. गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील राष्ट्रवादीत फुट पडून अंतर्गत दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एका गटाचे नेतृत्व उमेश पाटील करीत आहेत

तर दुसरा गट माजी आमदार राजन पाटील यांचा आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षापेक्षा , युती आघाडी करून विकासाच्या नावाखाली आपला-परका हा एकमेव मुद्दा असतो या सर्व घडामोडी बरोबरच राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्याही भूमिकेला तेवढेच महत्त्व आहे.

भीमा कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याने तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ आले आहे. गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी थोडेसे लक्ष घातले होते तर दोन्ही ठिकाणी निम्मी निम्मी सत्ता काबीज करण्यात यश आले होते.

खा महाडिक यांनी आता नगर परिषदेतही लक्ष घालणार असल्याचे सुतोवाच केल्याने कोण कोणा सोबत जाणार, कुणाकुणाची युती होणार हे येणारा काळच ठरविणार आहे. सध्या नगरसेवक होण्यासाठी अनेक जण विविध पक्षामध्ये इच्छुक आहेत, मात्र मतदार त्याच त्याच उमेदवारांना कंटाळल्याने नगरसेवक हा सुशिक्षित असावा, जनतेसाठी वेळ देणारा, समजदार असावा अशी भूमिका आता नागरिक मांडू लागले आहेत.

सध्या शिवसेना व काँग्रेसच्या गोटात शांतता आहे. शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड, माजी तालुका प्रमुख संजय देशमुख, यांच्या भूमिकेकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे) सरकार स्थापन झाल्याने पक्षश्रेष्ठी काय आदेश देतात यावरही बरेच अवलंबून आहे.तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर, भाजपाचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, भाजपाचे नेते संजय क्षीरसागर हे काय निर्णय घेणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

ठळक बाबी

सन 2016 चे पक्षीय बलाबल----

शिवसेना-6

राष्ट्रवादी -4

काँग्रेस-2

भाजपा-2

इतर-3

खा धनंजय महाडिक व आमदार यशवंत माने यांच्या भुमिका महत्वाच्या

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com