देशात सर्वाधिक स्टार्टअप कृषीपुरक उद्योग क्षेत्रात - राधाकृष्ण विखे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

radhakrishna vikhe patil

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ सोलापूर यांच्या मार्फत आयोजित जिल्हा कृषी महोत्सव २०२३ च्या उद्‌घाटनप्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

Startup : देशात सर्वाधिक स्टार्टअप कृषीपुरक उद्योग क्षेत्रात - राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर - शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. कोविड काळात उद्योग, व्यापार, व्यवसाय, रोजगार सर्व बंद असताना केवळ शेतकरी बांधव कार्यरत होते. केवळ त्यांच्या अपार कष्टाने अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून, अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद ठेवली आहे. यावरून या क्षेत्राचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. देशात सर्वाधिक स्टार्टअप कृषी क्षेत्रात निर्माण झाले, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ सोलापूर यांच्या मार्फत आयोजित जिल्हा कृषी महोत्सव २०२३ च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, उपसंचालक श्री. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सुभाष देशमुख यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक बाळासाहेब शिंदे यांनी केले आभार मदन मुकणे यांनी मानले.

वाळू उपसा थांबवा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनबद्ध करणे आवश्यक आहे. उजनीच्या पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करावा. यामुळे भविष्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या वाळू उपसा करून नद्या पोखरल्या जात आहेत. नदीतून वाळू उपसणे म्हणजे पाणी उपसणे आहे. हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे. वाळू उपसा थांबवा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे अभिनंदन

दुष्काळी ते सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा अशी सोलापूरची ओळख बदलू पाहात आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात मानव निर्देशांकामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. टीम लिडर चांगला असला की जिल्हा अग्रेसर होऊ शकतो, याचे उदाहरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घालून दिले आहे. त्यांनी विविध विचारधारेच्या लोकांना एकत्र आणून जिल्ह्याचा विकास केला, असे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री. शंभरकर यांचे विशेष अभिनंदन केले.

प्रदर्शनाचा लाभ घ्या

लक्ष्मी विष्णू मिल मैदान, मरी आई चौक, सोलापूर येथे हा कृषी महोत्सव सुरू असून तो ता. ९ मार्चपर्यंत हा खुला राहणार आहे. शेतकरी बांधवांनी आणि शहरातील नागरिकांनी या कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.