
सोलापूर : सोलापूर शहरात परवानाधारक खासगी सावकार ४९६ आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अक्कलकोट १११, माढ्यात ९६, बार्शीत ८८ आणि अकलूजमध्ये ८७ परवानाधारक सावकार आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत त्याठिकाणी सर्वाधिक आहेत. गतवर्षी जिल्ह्यात १०८१ परवानाधारक सावकार होते. यंदा ११६० सावकार झाले आहेत.
शासनाने खासगी सावकारांनाही शेती व बिगरशेती अशा दोन्ही प्रकारच्या कर्जवाटपाचा अधिकार दिला आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांचा (सहकार विभाग) परवाना घेणे बंधनकारक आहे. त्या परवानाधारक खासगी सावकाराला शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर आकरता येणार नाही, अशी अट आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षांत जिल्ह्यात एक हजार ८१ परवानाधारक खासगी सावकार होते. त्यांनी शहर-जिल्ह्यातील १६ हजार ७२७ व्यक्तींना ४७ कोटी ८२ लाखांचे बिगरशेतीचे कर्जवाटप केले होते. आता यंदा (२०२२-२३) जिल्ह्यात एक हजार १६० परवानाधारक खासगी सावकार आहेत.
त्यांनी साडेनऊ महिन्यांत शेती व बिगरशेतीचे अंदाजित ५० कोटींपर्यंत कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली. खासगी सावकारांचे या वर्षीचे कर्जवाटप किती नेमके किती हे ३१ मार्चनंतर स्पष्ट होणार आहे.
खासगी सावकारांना ‘या’ व्याजदराचे बंधन
परवानाधारक खासगी सावकारांनी ठरवून दिलेल्या व्याजापेक्षा अधिक व्याजदर घेतल्यास त्यांचा परवाना रद्द करून त्यांच्या कारवाई केली जाते.
बिगरशेती कर्ज देताना खासगी सावकारांना तारणी कर्जासाठी वार्षिक १५ टक्के तर विनातारण कर्जासाठी १८ टक्क्यांपर्यंतच व्याज आकारता येईल. शेतीसाठी कर्ज देताना वार्षिक व्याजदर नऊ टक्के आणि बिगरतारणी कर्ज १२ टक्के असावे, असे नियम आहेत.
व्याजाच्या रकमेपोटी कोणत्या खासगी सावकाराने जमीन हडप केल्यास त्यांच्यावर सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो. जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून ते खरेदीखत रद्द होऊन मूळ शेतकऱ्यास जमीन परत मिळते.
ज्यादा व्याजदर आकारता येत नाही
खासगी सावकारीचा परवाना देताना त्या व्यक्तीकडे कर्जवाटपासाठी स्व:निधी असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना कोणाकडूनही ठेवी स्वीकारता येणार नाहीत. परवानाधारक खासगी सावकारांना शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर आकरता येत नाही. कोणी तसे केल्यास कर्जदार पुराव्यानिशी आमच्याकडे तक्रार करू शकतो.
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
‘या’ कारणांमुळे वाढतात खासगी सावकार
शेती व बिगरशेती कर्जासाठी शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना सहकारी, राष्ट्रीयीकृत बॅंका, पतसंस्था व नागरी बॅंकांचा आधार आहे. पण, सततची नैसर्गिक आपत्ती, शेतमालांचे गडगडलेले दर, बॅंकांनी घातेलली ‘सिबिल’ची अट आणि बॅंकांच्या थकबाकीमुळे अनेकजण विशेषतः: शेतकरी सावकारांचा दरवाजा ठोठावतात. त्यातूनच खासगी सावकार वाढू लागले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षा यंदा ७९ खासगी सावकार वाढले आहेत. सांगोला ३८, दक्षिण सोलापूर ६७, मोहोळ ३७, करमाळा २६, मंगळवेढा २०, उत्तर सोलापूर १८, अशी परवानाधारक खासगी सावकारांची संख्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.