esakal | पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अकलूज येथील वाघ पिता-पुत्राने केली मोटारसायकलवरून उत्तर भारत भ्रमंती ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Bhramanti.

सातत्याने येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीला मानव जबाबदार असून, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी "झाडे लावा - प्रदूषण टाळा' असा संदेश देत बागेचीवाडी - अकलूजचे शेतकरी मोतीराम वाघ यांनी आपल्या तेरा वर्षीय मुलासह दुचाकीवरून संपूर्ण उत्तर भारत भ्रमंती केली. 

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अकलूज येथील वाघ पिता-पुत्राने केली मोटारसायकलवरून उत्तर भारत भ्रमंती ! 

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : सातत्याने येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीला मानव जबाबदार असून, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी "झाडे लावा - प्रदूषण टाळा' असा संदेश देत बागेचीवाडी - अकलूजचे शेतकरी मोतीराम वाघ यांनी आपल्या तेरा वर्षीय मुलासह दुचाकीवरून संपूर्ण उत्तर भारत भ्रमंती केली. 

महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी ढगफुटी, अतिवृष्टी व त्यामुळे आलेले पूर यासह उत्तराखंडमध्ये झालेला प्रकोप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या. पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास झालेला असून या ऱ्हासास मानवच जबाबदार आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावेत. यासाठी जनजागरणाची आवश्‍यकता लक्षात घेऊन बागेचीवाडी अकलूज येथील शेतकरी मोतीराम वाघ हे आपल्या मुलास सोबत घेत दुचाकीवरून उत्तर भारताची भ्रमंती केली. 

अकलूजहून पुणे, नाशिक, सप्तसृंगी गड येथे भेट दिल्यानंतर गुजरातमधील तारापूर, भावनगर, सातपुतरा, भडोच, केवडिया, स्टॅचू ऑफ युनिटी, जुनागड, गिरनार, सोरटी सोमनाथ, वेलावर बंदर, पोरबंदर, द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद मार्गे राजस्थानमधील उदयपूर, चित्तोडगड, अजमेर, पुष्कर, जोधपूर, पोखरण, गुडगाव, जयपूर, जैसलमेर, बिकानेर, पजाबमधील भरिडा, फिरोजपूर, अमृतसर, वाघा बॉर्डर, लुधियाना, चंदीगड, पानिपत, अंबाला, सहारनपूर, हरिद्वार, ऋषीकेश, मुझफ्फरनगर, मेरठ व परतीचा प्रवास दिल्ली, आग्रा, मध्य प्रदेशमधील गुना उज्जैन, इंदौर, ओंकारेश्वर, खांडवा, बुऱ्हानपूर मार्गे जळगाव, अजंठा वेरुळ, दौलताबाद, शनी शिंगणापूर, नगर, करमाळा, टेंभुणीहून अकलूज येथे परतले. अकलूज येथील गांधी चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

मोतीराम वाघ यांनी याआधीही अशा अनेक प्रवासी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यांनी 1990 मध्ये 95 दिवसांत सायकलवरून भारत भ्रमंती केली होती. यात जम्मू- काश्‍मीर ते कन्याकुमारी असा तब्बल 11 हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. त्या वेळीही त्यांनी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी परदेशगमनही केले. जपानसारख्या देशात गेल्यावर भाषेची अडचण जाणवली. त्यांनी वयाच्या 56व्या वर्षी पुन्हा सायकल दौरा करण्याची तयारी केली होती. मात्र वेळेअभावी त्यांनी दुचाकीवरून प्रवास करीत संपूर्ण दक्षिण भारत भ्रमण केले होते आणि आता उत्तर भारताचा प्रवास पूर्ण केला. 

या दोन्ही प्रवासादरम्यान त्यांनी आपला मुलालाही सोबत घेतले होते. आपल्या पुढच्या पिढीस विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी मुलगा लहान असूनही मुलाला सोबत घेतल्याचे ते सांगतात. दक्षिण भारतापेक्षा उत्तरेत फिरताना भाषेची अडचण जाणवली नाही; उलट महाराष्ट्रातून येऊन एखादी व्यक्ती काहीतरी सांगतेय म्हणून काही लोक आवर्जून थांबून ऐकतात. अशावेळी मलाही हिंदीतून आध्यात्मिक जोड देत पर्यावरणाबाबत सांगण्यास मोठा आनंद वाटत होता, असे मोतीराम वाघ "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image