esakal | भालकेंच्या नावाने मते मागता, त्यांना तरी न्याय दिलात का? खासदार निंबाळकरांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Nimbalkar

भालकेंच्या नावाने मते मागता, त्यांना तरी न्याय दिलात का? खासदार निंबाळकरांचा टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : प्रत्येक वेळी खोटी आश्वासने द्यायची आणि लोकांच्या भावनेचे राजकारण करून संधी साधायची, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची खेळी या वेळी उपयोगी पडणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदार (कै.) भारत भालके यांच्या निधनाचे थोडे जरी शल्य असते तर त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मंगळवेढ्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तरतूद केली असती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूलथापांना यंदा जनता फसणार नाही, असा टोला खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी "सकाळ'शी बोलताना लगावला.

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी खासदार श्री. नाईक निंबाळकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून भाजपने जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने ते बोलत होते.

खासदार श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, (कै.) भालके यांच्या नावाने मते मागत असताना राष्ट्रवादीने त्यांना तरी न्याय दिला का, याचा विचार भालके समर्थकांनी केला पाहिजे. राजकारणात कर्तृत्व सिद्ध करून पुढे जावे लागते, भावनेवर नाही. परिचारकांच्या घरातसुद्धा (कै.) सुधाकरपंतांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु परिचारकांनी त्याचे भांडवल केले नाही.

मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नाची माहिती आपल्याला आहे. बारामतीला पाणी मिळावे आणि नीरा उजव्या कालव्यातून पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागाकडे येणारे पाणी रोखले जावे यासाठी बारामतीकरांनी कायमच प्रयत्न केला. पंढरपूर- मंगळवेढ्यातील जनतेला आता वस्तुस्थिती समजली आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद न करता केवळ मतांसाठी राष्ट्रवादीकडून आपली फसवणूक केली जात असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेची महाविकास आघाडीच्या कारभारावर असलेली नाराजी या निवडणुकीमध्ये मतदार निश्‍चित व्यक्त करणार आहेत.

राष्ट्रवादीला पराभवाची भीती असल्यामुळेच त्यांनी अर्धे मंत्रिमंडळ प्रचारासाठी आणले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चारवेळा पंढरपूरला यावे लागले. वेगवेगळ्या माध्यमातून या मंडळींनी लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

बातमीदार : अभय जोशी