esakal | Solapur : शेतकऱ्यांना आता आठ तासच वीजपुरवठा! वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे महावितरणचे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना आता आठ तासच वीजपुरवठा!

महावितरणने शेतकऱ्यांना रात्री केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना आता 8 तासच वीजपुरवठा! वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे कारण

sakal_logo
By
संतोष सिरसट - सकाळ वृत्तसेवा

उत्तर सोलापूर : महावितरणने (MSEDCL) शेतकऱ्यांना रात्री केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी रात्री दहा तास तर दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र आता रात्री दहा ऐवजी आठ तासच वीजपुरवठा केला जाणार आहे. याला कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला असल्याचे कारण महावितरणने दिले आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना नियमितपणे दिवसा आठ तास तर रात्री दहा तास वीजपुरवठा केला जातो. त्यावर शेतकरी आपल्या पिकांना पाणी देण्याचे नियोजन करत असतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल केला जातो. त्यानुसार 1 ऑक्‍टोबरलाही वेळापत्रकामध्ये बदल केला होता. मात्र गुरुवारी (ता. 7) अचानक कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला असल्याचे कारण देत महावितरणने रात्रीच्या वेळेला आठ तास वीजपुरवठा करण्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रात्रीही केवळ आठ तासच वीज मिळणार आहे.

हेही वाचा: 'गुरे-गोठ्यांमध्ये रमणाऱ्या कांबळेंनी झेडपीचे दालन टक्केवारीचे केले!'

राज्यभर सगळीकडे मुसळधार पाऊस पडत असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली आहेत. त्यातच महावितरणने वीजबिल वसुलीचा तगादा मोठ्या प्रमाणात लावला आहे. शेतकऱ्याच्या हाती काहीच पडलेले नसताना वीजबिल भरायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यातच आता महावितरणने रात्रीसाठी केवळ आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांपुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.

हेही वाचा: नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! चौकशीचे आदेश

महाविकास आघाडीच्या काळात वसुली जोरात व वीजपुरवठ्यातही घट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महावितरणने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुलीचा तगादा लावला आहे. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे वीजबिल भरायचे कशाने, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच आता महावितरणने वीजपुरवठाही दोन तासांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागणार आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वीजपुरवठा चालू आठवड्यात केला जाणार आहे.

loading image
go to top