Solapur news | स्टेट्‌सवर झळकताहेत मतदारांचे बर्थ डे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

सोलापूर : स्टेट्‌सवर झळकताहेत मतदारांचे बर्थ डे !

सोलापूर : अगदी काही दिवसांवर येवून ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक व इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे अन्‌ कल्पना राबवित आहेत. प्रारुप प्रभागरचना जाहीर झाल्यापासून या इच्छुक मंडळींकडून भागातील कार्यकर्ते व मतदारांना त्यांच्या वाढदिवसाचे आकर्षक डीपी बनवून मोबाइल स्टेटस ठेवता यावेत, यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रभागातील मतदारांच्या वाढदिवसाबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे.

नगरसेवक अन्‌ इच्छुक उमेदवारांच्या मोबाइलवर कार्यकर्ते व मतदारांच्या वाढदिवसाचे स्टेट्‌स झळकू लागले आहेत. या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकजण सरसावल्याचे पहायला मिळत आहे. काही नगरसेवक व नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी आवर्जुन उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा सपाटा सुरू केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आपणच कसे वरचढ आणि प्रभावित आहोत, हे दाखविण्यासाठी या मंडळींकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर होताना दिसून येत आहे. प्रभागातील मतदारांचा वाढदिवस असल्याचे निदर्शनास आल्यास नगरसेवक व नव्याने इच्छुक उमेदवार हे व्हाट्‌स ऍप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर वाढदिवसाच्या पोस्ट अन्‌ स्टेटस ठेवून भरभरून शुभेच्छा देत आहेत. आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहरातील चौका-चौकात केक आणून कार्यकर्ते गोळा करुन त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्याचे फोटो सर्वत्र शेअर करीत आहेत. सोशल मीडियाचा वापर करीत इच्छुक मंडळी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियाचा पुरेपूर वापर

प्रभागातील मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल, असाच सर्वांचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यात सद्यस्थितीत प्रत्येक प्रभागातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध फंडे वापरतानाच तेथील विकासकामे उत्तम प्रकारे कशी करता येतील याचीही स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. प्रभागातील समस्या, तेथील केलेली विकासकामेदेखील नगरसेवक व इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर आणि स्वतःच्याही मोबाईल स्टेट्‌सवर ठेवत आहेत. शहरातील भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, बसपा, एमआयएम, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व पक्षातील नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्धीमाध्यम म्हणून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत.

ठळक बाबी....

  • नगरसेवक व नव्याने इच्छुक उमेदवार मतदारसंघातील लग्न समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमास आवर्जुन लावताहेत उपस्थिती

  • मतदारांना स्टेट्‌सच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा वाढला कल

  • प्रभागातील प्रत्येक लहान-सहान कामांची माहितीही स्टेट्‌स ठेवण्यावर भर

  • मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर नवनवीन फंडे

Web Title: Municipal Elections Social Media Tricks Attract Voters Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top