
सोलापूर : अनैतिक संबंधातून वडाळ्यात तरुणाचा खून
सोलापूर - अनैतिक संबंधातून महिलेने पैशांची मागणी केली. पैसे देऊनही आणखी पैशांची मागणी केली, पण ते पैसे मिळत नसल्याच्या रागातून महिलेने दीपक ऊर्फ दादा कोळेकर (वय ३५, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) याचा खून केला. संशयित महिला आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. घटनेची हकीकत अशी, वडाळ्यातील दीपक कोळेकर याची गावातच पानटपरी आहे. त्याचे गावातील महिलेबरोबर पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मागील दोन-अडीच वर्षांपासून त्या महिलेने दीपककडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तेव्हापासून त्यांच्यात सतत भांडण होत होते. त्या महिलेला कंटाळून दीपकने शेतातील जनावरे व स्वत:कडील वाहने विकून काही पैसे दिले होते.
तरीही, तिने आणखी पैशांची मागणी केली. वडाळ्यात पानटपरी चालविणाऱ्या दीपकला ते पैसे देता आले नाहीत. वारंवार पैसे मागूनही दीपक पैसे देत नसल्याने त्या महिलेने शनिवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास एका साथीदाराच्या मदतीने दीपकला दुचाकीवर बसवून नेले. रात्रीच्या साडेआठच्या सुमारास दीपक हा बेशुद्धावस्थेत जयश्री भोसले या महिलेच्या घरासमोरील गटारात पडला होता. त्याला सुरवातीला वडाळा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आणले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दीपकचे वडील शिवाजी कोळेकर यांनी या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, या गुह्याचा तपास प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक हे करीत आहेत.
पोलिसांनी केला घटनास्थळाचा पंचनामा
अनैतिक संबंधातून एका महिलेने दीपक कोळेकर याच्या डोक्यात लोखंडी पाइप घालून ठार मारले. तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आज (रविवारी) वडाळ्यात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title: Murder Of Youth Due To Immoral Relationship In Wadala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..