
Pandharpur News : वारकऱ्यांच्या चंद्रभागेत घाणीचे साम्राज्य
पंढरपूर : तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेली नमामि चंद्रभागा योजना आठ वर्षानंतरही कागदावरच आहे. त्यातच आता नगरपालिका आणि महसूल विभागाच्या उदासीनतेमुळे लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या चंद्रभागा नदी पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदीपात्रातील अस्वच्छतेमुळे चंद्रभागेच्या पावित्र्याला धक्का पोचल्याची भावना वारकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारने चंद्रभागा नदी स्वच्छतेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी आज पंढरपुरात केली. अक्षय महाराज भोसले यांनी शुक्रवारी (ता. १३) चंद्रभागा नदीची पाहणी करून काही निरीक्षणे नोंदवली आहेत. या संदर्भातील एक अहवाल तयार करून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत. त्यांच्या पाहणी नंतर चंद्रभागेच्या स्वच्छतेचा व शुध्दतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चंद्रभागा वाळवंट अस्वच्छतेचा आणि पाणी शुद्धीकरणाचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या विषयी अनेक वारकरी महाराज मंडळींनी सरकार व प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली आहेत. तरीही सरकारला अद्याप उपरती आली नाही. मागील आठ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत वाराणसी येथील नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा योजनेची घोषणा केली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ देखील केला.
त्यानंतर गेल्या आठ वर्षामध्ये नदी स्वच्छतेच्या कामाकडे ना सरकारने लक्ष दिले ना नगरपालिकेने. उलट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीपात्राचे सौदर्य नष्ट होवून चंद्रभागेला बकालपण आले आहे. वाळू चोरीमुळे नदीपात्रात मोठ मोठे ख़ड्डे पडले आहेत. याच खड्ड्यात अनेक भाविकांनी आपला जीव गमावला आहे. तरीही पोलिस आणि महसूल प्रशासन गप्प का याचे, ही कोडे अजून भाविकांना सुटले नाही.
स्नान करणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न
नदीपात्रातील पाणी अस्वच्छ असल्यामुळे भाविकांना स्नान करण्यास धोकादायक असल्याचा अहवाल संबंधित विभागाने पालिका प्रशासनाला दोन वर्षापूर्वीच दिला आहे. तरीही हजारो भाविक श्रध्देच्या भावनेने आरोग्यास हानिकारक असलेल्या नदीपात्रातील अस्वच्छ पाण्यात स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतात. नदी पात्रात कपडे, कचरा आणि अन्नाचे ढिग साचले आहेत. नदीपात्रातील घाणीमुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदीपात्रात स्नान करणाऱ्या हजारो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.