Solapur : आता रोहितदादांचीही राष्ट्रवादी, पत्रास कारण की.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar

Solapur : आता रोहितदादांचीही राष्ट्रवादी, पत्रास कारण की..

पत्रास कारण की, आपण नुकतेच सोलापुरात येऊन गेलात. सर्वांशी (अगदी विद्यार्थ्यांशीही) संवाद साधला बरे वाटले.. नाहीतर अलीकडे तुमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी रात्री-अपरात्री सोलापुरात येऊन ‘ठराविक’ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची प्रथा पाडली आहे. ही प्रथा मोडून आपण थेट पत्रकारांशी अन्‌ विद्यार्थ्यांशी संपर्क करत आहात, हे पाहून आनंद वाटला.

बाय द वे, तुमच्या पक्षाची स्थिती तुम्ही स्वत: अजमावली असेलच. आम्ही कशाला सांगावी...पण सहज विषय निघालाच म्हणून लिहावेसे वाटले. तुमच्या पक्षाची अवस्था एका वाक्यात सांगायची झाली तर, सोलापूर शहरात बरी, मोहोळ, माढ्यात एकदम चांगली अन्‌ पंढरपुरात जरा चांगली आहे. बाकी सांगोला थोडाफार ठीक,

उर्वरित जिल्ह्यात आनंदीआनंदच आहे. पण मोहोळ अन्‌ माढ्यात असलेले चांगले पीक आयतेच दुसरीकडे जाण्याच्या बेतात आहे. ‘बेतात’ कसलं १९ फेब्रुवारीचा मुहूर्तही ठरला आहे. तुम्ही मागच्यावेळी ‘मोहोळ हातचे जाणे परवडणारे नाही,’ असे म्हणाला होता. पण आता हातचे गेल्यात जमा आहे. ‘मोहोळ गेले तरी बार्शी’ येईल असे म्हणावे… तर बार्शीच्या ‘कोट्या’वर गेल्या महिन्यात थोरल्या साहेबांच्या उपस्थित ‘भाऊ’च्या प्रवशोत्सवाची जय्यत तयारी झाली होती.

पण अचानक मोठ्या साहेबांची तब्येत बिघडली अन्‌ प्रवेश लांबणीवर पडला. तालुक्याची कार्यकारिणीदेखील तयार झाली आहे. पण अजून म्होरक्याच पक्षात आलेला नाही. थांबल्यासारखे एकाला-एक लागून दोन भाऊ आले म्हणजे बरे... असाच प्रकार पंढरपूरच्या अभिजित पाटलांचा आहे. जेवणावळी झाल्या पण प्रवेशाबाबत पाटील काहीच बोलत नाहीत... ‘आत की बाहेर’ काहीच समजत नाही. निर्णय अधांतरीच आहे.

बाकी सांगोल्यात आबा म्हणजे राष्ट्रवादी एवढाच विषय आहे. करमाळ्यात ‘मामां’चा ओढा राष्ट्रवादीकडे आहे, पण ते अजून बाहेरच आहेत. बार्शीच्या साहेबांचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे, पण तेही तळ्यात-मळ्यातच आहेत, अशीच सर्व जिल्ह्याची स्थिती आहे. जिल्हाभर मूळ राष्ट्रवादी कमी अन्‌ ‘समविचारी’, शरद पवारांची राष्ट्रवादी अन्‌ दादांचा गट आहे… आता त्यात ‘रोहितदादांची राष्ट्रवादी’ याची भर पडू नये, म्हणजे मिळवले...

असो. एक बरे झाले, आपल्या सोलापूरच्या चकरा वाढल्या आहेत. पूर्वी थोरल्या साहेबांचे सोलापूरवर लक्ष होते. आता तुमचेही राहिले म्हणजे बरे… तुमच्याशी झालेल्या संवादातून तुम्हाला सोलापुरातील आइस्क्रीम आवडते, हे ऐकून बरे वाटले. एरवी सोलापूर शेंगा-चटणी, कडक भाकरी अन्‌ हुरड्यापुरते मर्यादित होते.

आता शिक कढई अन्‌ आइस्क्रीमचीही भर पडेल. लौकिक वैभव वाढत नसले तरी ‘खाद्य’ वैभवात तरी भर पडते आहे, याचे आम्हा सोलापूरकरांना तेवढेच समाधान वाटते... बाकी साखर कारखाने... पाणी हे प्रश्न कायम न सुटणारेच आहेत. आज ना उद्या आपण सोडवालच... येत जावा अधूनमधून...

सोलापुरातून विमान उडावे, अशी तुमचीदेखील इच्छा आहे, हे आपल्याशी बोलल्यावर जाणवले. मात्र, ते ‘चिमणी’ला धक्का न लावता उडावे, असेही तुम्हा वाटते. यावरून अजून दहा-वीस वर्षे तरी तुम्हाला मोटारीनेच सोलापूरला ये-जा करावी लागेल, असा अंदाज आहे.

आपला विश्वासू

सोलापुरी कार्यकर्ता