सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PRANITI SHINDE SUSHILKUMAR SHINDE
काँग्रेसला एकाकी पाडण्याचा राष्ट्रवादीचा डाव? शहरात पक्षांतर अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत

सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?

सोलापूर : महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच, असे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजी व पक्षांतराचाच सर्वाधिक फटका बसणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गळती लागलेली असतानाही वरिष्ठ नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागत असल्याचीही धूसपूस कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजपने काँग्रेसला एकटे पाडण्याचा डाव टाकला असून, काँग्रेसमधील नाराजांना ते उमेदवारीचे आश्वासन देऊन पक्षांतरास भाग पाडत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य

वर्षानुवर्षे महापालिकेत सत्ता मिळविलेला काँग्रेस सध्या अडचणीतून पुढे जात आहे. अशा परिस्थितीत पक्षातील नेत्यांना विश्वास देऊन पक्षातच ठेवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. पाच-सात वर्षांत तीन माजी महापौर, एक माजी आमदार व माजी शहराध्यक्ष तर काही माजी नरसेवक व महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मागील वर्षी माजी महापौर नलिनी चंदेले यांनी पक्षांतर केल्यानंतर ‘त्या मागील काही महिन्यांपासून आमच्या पक्षात नव्हत्याच’, असे स्पष्टीकरण नेत्यांनी दिले. त्याचवेळी माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला हात दाखविला, त्यावेळी ते अचानक गेल्याचे सांगितले. पण, ॲड. यू. एन. बेरिया हे पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वासही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी व्यक्त केला. त्यानंतर गटनेते चेतन नरोटे यांच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊनही ते राष्ट्रवादीत जाण्यावर ठाम राहिले. तत्पूर्वी, महेश कोठे, दिलीप माने, अमोल शिंदे यांनीही काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री केंद्रात असताना जिल्ह्यातील काँग्रेसकडे तगडा नेता नसल्याने पक्षाची लोकप्रियता कमी झाल्याचे ओळखून अनेकजण पक्षातून बाहेर पडत होते. त्यावेळी त्याकडे लक्ष दिले नाही, अशीही चर्चा आहे. आता पक्षांतर थांबेल असे वाटत असतानाच महिला काँग्रेसच्या शहर सरचिटणीस व अन्य एका पदाधिकाऱ्याने पक्ष सोडला. त्यांनी शहरातील काँग्रेसमधील गटबाजीवर आक्षेप घेतला. त्याचे आत्मचिंतन नेत्यांना करावे लागणार आहे.

हेही वाचा: काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी! ‘या’ प्रमुख कारणामुळे फिस्कटणार महाविकास आघाडी

...तर भंडारा-गोंदियातील प्रयोग शक्य
जागा वाटप किंवा प्रभावशाली प्रभागावरून महाविकास आघाडी न झाल्यास सर्वच पक्ष एकमेकांविरुद्ध लढतील. त्यावेळी पाडापाडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यस्तरावर भाजप- शिवसेनेचा कट्टर विरोध पाहता भाजप- शिवसेना एकत्र येणे शक्य वाटत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेला भाजप किंवा राष्ट्रवादीला काही जागांची कमतरता भासल्यास भंडारा- गोंदियातील प्रयोग सोलापूर महापालिकेत होऊ शकतो किंवा शिवसेना- काँग्रेसला चांगले बहुमत मिळाल्यास ते दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशीही चर्चा आहे.

हेही वाचा: बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन ‘परिवर्तन’! ७८ गावांवर वॉच

राष्ट्रवादीकडे ११३ उमेदवार नाहीत
महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढू शकतो. काँग्रेसनेही गोळाबेरीज करून सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे ११३ जागांवर लढण्यासाठी तगडे उमेदवार नाहीत, त्यामुळे ते फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप शहरातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेत्यांनी भाजपपेक्षाही राष्ट्रवादीच्या डावपेचावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तर दुसरीकडे, यापुढे कोणीही पक्षांतर करू नये म्हणून शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना तारेवरील कसरत करावी लागत असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Ncps Instinct To Leave Congress Alone In Mumbai Delhi The Attention Of Party Leaders Is

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top