नुतन DCP बोऱ्हाडे म्हणाले, क्रेनने वाहन उचलण्यापूर्वी चालकांना ३ मिनिटांची पूर्वसूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit borhade
नुतन DCP बोऱ्हाडे म्हणाले, क्रेनने वाहन उचलण्यापूर्वी चालकांना ३ मिनिटांची पूर्वसूचना

नुतन DCP बोऱ्हाडे म्हणाले, क्रेनने वाहन उचलण्यापूर्वी चालकांना ३ मिनिटांची पूर्वसूचना

सोलापूर : शहरातील रस्ते अरुंद असून, वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यालगत वाहनांची संख्याही मोठी पाहायला मिळते. ‘नो पार्किंग’मधील वाहने थेट उचलून पोलिसांत जमा केली जातात. पण, आता त्या वाहनचालकांना वाहन काढून घेण्यासाठी तीन-चार मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यांना स्पीकरद्वारे पूर्वसूचना केली जाईल. त्यानंतर ती वाहने उचलली जातील, अशी माहिती नूतन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर शहर पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, डॉ. वैशाली कडूकर व बापू बांगर यांची दुसरीकडे बदली झाली. त्यांच्या जागेवर अनुक्रमे अजित बोऱ्हाडे, विजय कबाडे व डॉ. दीपाली काळे यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर क्राईम असोसिएशनच्या वतीने श्री. बोऱ्हाडे व श्री. कबाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. बोऱ्हाडे म्हणाले, वाहतूक शिस्त लागावी यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल. चौकात किंवा वाहनांची गर्दी असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिस यापुढे कारवाई करणार नाहीत. दरम्यान, वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून सातत्याने स्पेशल ड्राइव्ह राबविला जाईल. त्यावेळी प्रत्येक वाहन तपासले जाईल. त्यावेळी वाहनांची मालकी कोणाची, हे प्रामुख्याने पडताळणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातून चोरीची वाहने समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्यांना वरिष्ठांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही

सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखताना गुन्हेगारी रोखणे खूप महत्त्वाचे आहे. समाजातील कोणत्याही सर्वसामान्यांना तक्रार देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जायला लागू नये, यादृष्टीने आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही नूतन पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली. दुसरीकडे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे वाढणे काळाची गरज असून त्यादृष्टीने ठोस प्रयत्न होतील. पोलिस चौक्यांची गरज आहे का पडताळून पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यासंबंधीचा निर्णय होईल, असेही श्री. कबाडे यांनी यावेळी सांगितले. आपण पोलिस खात्यात येण्यापूर्वी तीन वर्षे नायब तहसीलदार म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात काम केले. त्यानंतर एमपीएससीच्या माध्यमातून पुन्हा एकदा यश मिळवत २०११ पासून नाशिक, वाशीम, नांदेड शहर, अहमदपूर, बीड, नांदेड ग्रामीण या ठिकाणी पोलिस खात्याअंतर्गत सेवा केली. आता सोलापूर शहर आयुक्तालयात उपायुक्त म्हणून रुजू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.