esakal | कडक लॉकडाउनमध्येही दुकाने सुरू राहणार का? 1 मेपर्यंत उघडण्याचे नवे आदेश

बोलून बातमी शोधा

कडक लॉकडाउनमध्येही दुकाने राहणार का सुरू? 1 मेपर्यंत उघडण्याचे नवे आदेश
कडक लॉकडाउनमध्येही दुकाने राहणार का सुरू? 1 मेपर्यंत उघडण्याचे नवे आदेश
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कडक संचारबंदी काळात बंद असलेली किराणा दुकाने, सर्व खाद्य पदार्थांसह अन्य दुकाने काही तास सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसे नवे आदेश काढले असून, 1 मेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

जानेवारी-फेब्रुवारीत कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने 14 एप्रिलच्या रात्रीपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, नागरिकांसह दुकानदारांच्या अडचणींचा विचार करून राज्य सरकारने नवे आदेश काढून किराणा दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मटन, मासे, चिकन, अंडी विक्रीची दुकाने, कृषी अवजारांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांसंदर्भातील दुकाने आणि पावसाळ्याशी संबंधित कामांना अडचणी येणार नाहीत, अशी दुकाने उघडण्यास काही तासांची परवानगी दिली आहे.

सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. तर बार, रेस्टॉरंट, हॉटेल उघडण्यास परवानगी दिलेली नसून रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी त्यांची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे मेडिकल, हॉस्पिटलला मात्र वेळेचे कोणतेही बंधन नसल्याचेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.

गोंधळलेले प्रशासन अन्‌ लोकांमध्ये संभ्रम

जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी तर महापालिका आयुक्‍तांनी शहरासाठी नवे आदेश काढून दुकाने चालू करण्यास परवानगी दिली. 20 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे. तर दुसरीकडे राज्यात एक-दोन दिवसांत कडक लॉकडाउन होईल, असे काही मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कडक लॉकडाउन असतानाही त्या काळात हे आदेश कायम राहणार का, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.

नव्या आदेशानुसार...

  • मेडिकल, हॉस्पिटलला वेळेचे कोणतेही बंधन नाही

  • बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स उघडण्यास परवानगी नाही; रात्री आठपर्यंत घरपोच सेवेस परवानगी

  • किराणा दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू राहतील

  • कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची घ्यावी खबरदारी; नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकानांना लागणार सील