
पर्यावरण परिसंस्थेला कोणताही फायदा न देणाऱ्या, अल्पशा वाऱ्यात कोसळणाऱ्या विदेशी वृक्षांची लागवड बंद करण्यात आली आहे.
सोलापूर : पर्यावरण परिसंस्थेला (Environmental ecosystem) कोणताही फायदा न देणाऱ्या, अल्पशा वाऱ्यात कोसळणाऱ्या विदेशी वृक्षांची लागवड बंद करण्यात आली आहे. त्याजागी देशी वृक्षांच्या लागवडीला (Planting of native trees) प्राधान्य देण्याचे धोरण वन खात्याने (Forest Department) स्वीकारले असून, राखीव जंगलातील अशी झाडे काढण्याबाबतच्या सूचना "वर्किंग प्लॅन'मधून देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने चार वर्षांपासून सप्तपर्णीची (Saptaparni) लागवड बंद केली असून, पर्यायी झाडे तयार होताच सप्तपर्णी काढली जाणार आहेत.
ग्लिलिसिडीया (उंदीरमार), काशीद, गुलमोहर, सप्तपर्णी, रेन ट्री या वनस्पती भारतीय पर्यावरण परिसंस्थेला पोषक नाहीत. या वृक्षांची वाढ झापाट्याने होते; मात्र शेजारील इतर वृक्षांना त्या वाढण्यास वाव देत नाहीत. केवळ दिसण्यास शोभेच्या असणाऱ्या या वनस्पतींचे लाकूड ठिसूळ असल्याने तसेच मुळे कमजोर असल्याने ही झाडे वारा- पावसात लवकर कोसळतात. ही झाडे विदेशी असून, खूप पूर्वी भारतात स्थलांतरित झाली आहेत. ही झाडे लवकर वाढत असल्याने, अवघ्या चार वर्षांत फुलांनी बहरून जाणारी असल्याने सरकारी अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही या झाडांना लागवडीत प्राधान्य दिले. मात्र, पक्षी अभावानेच या झाडांवर घरटी करतात. मधमाशाही या वृक्षांच्या फुलांवर घोंगावत नाहीत. यामुळे या प्रजाती पर्यावणास अनुकूल नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे ही झाडे भारतीय पर्यावरणीय परिसंस्थेला हानिकारक असल्याचे निदर्शनास आल्यापासून ही झाडे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चार वर्षांत लावली नाही एकही सप्तपर्णी
सोलापूर शहरात आज रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र सप्तपर्णी दिसते. मात्र, मागील चार वर्षांत एकही नवे झाड लावलेले नाही. या झाडांना पर्यायी झाडे तयार करून ही झाडे कमी केली जाणार आहेत. ही सर्व झाडे 15-16 वर्षांपूर्वीची आहेत. आता आम्ही देशी वृक्षांना प्राधान्य देत आहोत. एकाच वेळी इतकी झाडे काढणे योग्य नसल्याने या झाडांना पर्यायी झाडे लावून हळूहळू ही झाडे काढण्यात येणार आहेत. मात्र, मी पदभार स्वीकारल्यापासून चार वर्षात एकही सप्तपर्णीचे झाड लावले नाही, अशी माहिती महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख निशिकांत कांबळे यांनी दिली.
ग्लिलिसिडीया (उंदीरमार) : या झाडाचे भारतीय नाव गिरिपुष्प असून, याच्या बिया खाल्ल्यावर उंदीर मरतात. म्हणून यास उंदीरमार असेही म्हणातात. हा वृक्ष 30 ते35 फुटांपर्यंत उंच होतो.
गुलमोहर : हा वृक्ष मादागास्कर या देशातून भारतात आला आहे. अनेक शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लागवड झाली आहे. अतिशय सुंदर फुले फुलतात, मात्र हा वृक्ष लवकर कोसळतो. अगदीच पर्याय नसेल तरच पक्षी या वनस्पतीवर बसतात.
सप्तपर्णी : सोलापूर शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे आहेत. ही वनस्पती आयात केलेल्या गव्हाबरोबर भारतात आली. ही वनस्पती मोहरते तेव्हा याच्या उग्र वासामुळे अनेकांना विशेषत: दमा व अस्थमा असणाऱ्या रुग्णांना त्रास होतो.
विदेशी वनस्पती : वरील चार वनस्पतींशिवाय इतर काही वनस्पती विदेशी आहेत. निलगिरी, आकेशिया, पेट्रोफोरम, कॅशिया, स्पॅथोडिया आदी.
देशी वनस्पती : पांगरा, सावर, सीताफळ, जांभूळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, कदंब आदी
विदेशीला पर्यायी देशी वनस्पती
लालजर्द फुलांची उधळण करणारा पळस व पांगरा हे गुलमोहराला पर्याय
नयनरम्य बहावा सोनमोहरास पर्याय
महाराष्ट्राचे राज्यफूल जारुळ (ताम्हण) निलमोहरास पर्याय
विदेशी वृक्षांची नवी लागवड सध्या बंद आहे. भारतीय प्रजातींना प्राधान्याचे धोरण आहे. ग्लिलिसिडीया (उंदीरमार), काशीद, गुलमोहर, सप्तपर्णी, रेन ट्री ही झाडे काढावीत असा उल्लेख "वर्किंग प्लॅन'मध्ये आहे.
- बाबा हाके, सहाय्यक वनसंरक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.