कामती पोलीसांनी पकडला नऊ लाखाचा गांजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganja Seized

कामती पोलीसांनी पकडला नऊ लाखाचा गांजा

मोहोळ - दादपूर, ता. मोहोळ येथील शिवारात एका उसाच्या शेतात लागवड केलेला नऊ लाख रुपये किमतीचा गांजा कामती पोलिसांनी पकडला असून, या प्रकरणी त्या शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता ४ तारखे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याची माहिती कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली. बाजीराव लोभा राठोड (वय-५६) रा. लमाणतांडा, कामती खुर्द, ता. मोहोळ असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादपूर शिवारातील एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत कामती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, सहाय्यक फौजदार महादेव पवार, हवालदार यशवंत कोटमळे, बबन माने, रमेश वाघमारे, पोलीस नाईक अमोल नायकोडे,भरत चौधरी, परमेश्वर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जगन इंगळे, अनुप दळवी, हरिदास चौधरी, सागर चव्हाण, यांच्यासह गाव कामगार तलाठी रणजीत घुणावत, तलाठी अशोक राठोड, मंडल निरीक्षक सुनील बेलभंडारे हे दादपूर येथील बाजीराव लोभा राठोड यांच्या जमीन गट नंबर ५१/१/ब मधील उसाचे पिकात जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी ९०.७९० किलो वजनाची ७५ लहान मोठी गांजाची हिरवा पाला असलेली झाडे मिळून आली. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जीवराज जनार्धन कासवीद यांनी फिर्याद दिली आहे.ही कारवाई नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.

टॅग्स :policecrimemohol