
निवडणुकीचा प्रचार शाळेच्या वेळेत नको
सोलापूर - प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी आठ संघटनांचे प्रमुख व निवडणुकीतील पॅनेलप्रमुखांसह जवळपास साडेपाचशे शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांशी संपर्क साधत आहेत. पतसंस्था निवडणुकीचे कामकाज व प्रचार शाळेच्या वेळेत नकोच, अन्यथा संबंधितांवर बिनपगारीची कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिला आहे.
शिक्षक पतसंस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज (शुक्रवारी) इच्छुकांनी केलेल्या अर्जांची छाननी झाली आहे. १९ जागांसाठी २४ जुलैला मतदान तर २५ जुलैला मतमोजणी होणार आहे. साधारणत: एक महिनाभर ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. तीन पॅनेलमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता असून, प्रत्येकाने आपल्या पॅनेलच्या विजयासाठी कंबर कसली आहे. ११ जुलैपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.
तत्पूर्वी, पतसंस्थेच्या सात हजार १२६ सभासदांशी संपर्क करून तथा त्यांना भेटून पॅनेलप्रमुख व इच्छुक उमेदवार विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून पतसंस्थेच्या निवडणुकीचे कामकाज करताना कोणी आढळला किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बिनपगारीची कारवाई केली जाणार आहे.
शिक्षकांनी शाळेत वेळेआधी यावे
पेनूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील आठ शिक्षकांवर बिनपगारीची कारवाई केल्यानंतर काही शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. शाळा आठ वाजता भरते, असे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्नही केला. पण, साडेसात ते सव्वाआठ या वेळेत ते शिक्षक शाळेत आले नव्हते म्हणून कारवाई केल्याचे किरण लोहार यांनी सांगितले. दरम्यान, शाळा भरण्यापूर्वी अर्धा तास अगोदर शिक्षकांनी शाळेत हजर राहणे बंधनकारकच आहे, अन्यथा तशी कारवाई पुन्हा केली जाईल, असेही त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
Web Title: No Election Campaign During School Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..