esakal | आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद! विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर ठरणार समीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde-Patole

आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर रिक्‍त मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे.

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) दहा कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रिपदे आणि विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसच्या वाट्याला आले. दरम्यान, अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाचे खांदेपालट अथवा विस्तार होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते; जेणेकरून पक्षाला बळकटी येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकद वाढण्याची संधी मिळते. या पार्श्‍वभूमीवर आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर रिक्‍त मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे. मंत्रिपद एक आणि इच्छुक अनेक, अशी स्थिती निर्माण झाल्याने त्या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) की अन्य कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Now MLA Praniti Shinde is likely to get the ministerial post-ssd73)

हेही वाचा: तिन्हीवेळा कर्जमाफीचा लाभार्थी, तरीही कर्ज मिळत नसल्याची तक्रार

राज्याच्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसकडून (Congress) मातब्बर नेत्यांना पुन्हा मंत्रिपदे मिळाली आहेत. अध्यक्षपदावरून आता पक्षांतर्गत कुरघोडी सुरू असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांच्यासह अन्य काहीजण त्या पदासाठी इच्छुक आहेत. परंतु, पक्षाचे काम करताना जनतेला, कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना न्याय देता येईल, अशी भावना नेत्यांच्या मनात असते. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी तीनवेळा विजय मिळवला. तिन्ही निवडणुकांत त्यांनी मातब्बर नेत्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Former Union Home Minister Sushilkumar Shinde) यांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव झाला, तरीही आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदारकीला गवसणी घातलीच. अशा परिस्थितीत त्यांना 2019 च्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा सर्वांनाच विश्‍वास होता. त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजीचा वेध घेऊन पक्षाने त्यांना महिला कॉंग्रेसचे कार्याध्यक्षपद दिले. मात्र, त्यापेक्षाही मंत्रिपद मिळावे ही त्यांची इच्छा कायम असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: तीन अपत्ये असतानाही महापालिका निवडणूक लढणे भोवले !

कॉंग्रेसकडून सद्य:स्थितीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित देशमुख, के. सी. पाडवी, अस्लम शेख यांना कॅबिनेट तर सतेज पाटील आणि विश्‍वजित कदम यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. कॉंग्रेसने त्यातील एका मंत्र्याला विधानसभेचे अध्यक्षपद दिल्यास रिक्‍त होणाऱ्या जागेवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) स्वत: इच्छुक असतील की आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी ते मंत्रिपद सोडतील, याचेही समीकरण कार्यकर्ते जुळवू लागले आहेत. नितीन राऊत यांचे नाव आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

भाजपने दोन मंत्रिपदे दिली, पण कॉंग्रेसकडून काहीच नाही

राज्यात शिवसेना (Shivsena)-भाजपची (BJP) सत्ता असताना 2014 नंतर सोलापूर जिल्ह्यातील आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांना कॅबिनेट तर आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांना राज्यमंत्रिपद दिले. तत्पूर्वी, उत्तमप्रकाश खंदारे यांनाही मंत्रिपद मिळाले होते. दुसरीकडे, कॉंग्रेस- राष्ट्रवादीची (Nationalist Congress Party) सत्ता असतानाही अनेकांना मंत्रिपदे मिळाली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्‍वास होता. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, ज्या ज्या वेळेस कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता आली, तेव्हा कॉंग्रेसला मंत्रिपद मिळाल्याने आता आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्यावे. या पार्श्‍वभूमीवर आता कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image