esakal | दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी विद्यार्थ्यांची अट! 'या' शाळांमधील मुलेच त्यांच्या शाळेत देऊ शकतील परीक्षा

बोलून बातमी शोधा

0Exam_20studant_0 - Copy.jpg

दहावी आणि बारावीत प्रत्येकी 50 विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच त्या शाळेत परीक्षा देता येणार आहे. 50 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वीच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा द्यावी लागेल, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी विद्यार्थ्यांची अट! 'या' शाळांमधील मुलेच त्यांच्या शाळेत देऊ शकतील परीक्षा

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यभरातील 30 लाख विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा देणार असून बारावीची परीक्षा 23 तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होईल. राज्यात कोरोना वाढत असल्याने विद्यार्थी, पालकांच्या मनातील भिती दूर करण्याच्या हेतूने 20 एप्रिलपर्यंत जनजागृतीचे वर्ग भरविले जाणार आहेत. दरम्यान, दहावी आणि बारावीत प्रत्येकी 50 विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच त्या शाळेत परीक्षा देता येणार आहे. 50 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वीच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा द्यावी लागेल, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्रत्येक शाळांमध्ये परीक्षा घेण्यास अडचणी 
राज्यभरात दहावी-बारावीचे वर्ग असलेल्या सुमारे 38 हजारांपर्यंत शाळा आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे एका वर्गात 24 ते 25 विद्यार्थी बसविले जाणार असून एका केंद्रावर किमान दोन पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, सहायक केंद्रप्रमुख नियुक्‍त करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत अनेक शिक्षक कोरोना बाधित असून अनेक शाळांमध्ये रिक्‍तपदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वच शाळांमध्ये परीक्षा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात उद्या (मंगळवारी) शालेय शिक्षणमंत्री व पुणे बोर्डाचे अध्यक्ष, शिक्षणसंचालकांसह माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यावर मार्ग निघण्याची शक्‍यता आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यत ऑनलाइन-ऑफलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविण्यात आला असून बहुतेक शाळांनी पूर्व परीक्षाही घेतल्या आहेत. आता कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. तरीही, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढावा, त्यांच्या मनातील कोरोनाची भिती दूर व्हावी म्हणून दहावी-बारावीचे वर्ग सुरूच ठेवले जाणार आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. जेणेकरून बहुतांश विद्यार्थी परीक्षा देतील, असा त्यामागचा हेतू आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 87 शाळांमधील दहावीचे 60 हजार तर बारावीचे 64 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आता 50 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे 50 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील त्या विद्यार्थ्यांची सोय यापूर्वीच्या परीक्षा केंद्रांवर करण्याचेही नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले असल्याचेही सांगण्यात आले.

दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहतील
राज्य सरकारने कोरोनासंबंधीचे घातलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन करून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविता येणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील, यादृष्टीने जनजागृती केली जाईल.
- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर