esakal | ओझेवाडी सोसायटीत नियमबाह्य, बोगस कर्जवाटप! चौकशी अहवालातून धक्कादायक बाब उघड | Solapur News
sakal

बोलून बातमी शोधा

ओझेवाडी सोसायटीत बोगस कर्जवाटप

ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीने बॅंकेचे नियम डावलून बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ओझेवाडी सोसायटीत बोगस कर्जवाटप! चौकशी अहवालातून धक्कादायक बाब उघड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : नियमबाह्य कर्ज (Illegal loans) वाटपामुळे आधीच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (Solapur District Central Co-operative Bank) अडचणीत आली आहे. अशात आता बॅंकेशी संलग्न असलेल्या ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीने बॅंकेचे नियम डावलून बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही शेतकऱ्यांच्या शेतात पीक नसतानाही सोसायटीने लाखो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सोसायटीने बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा वस्तुस्थितीचा अहवाल बॅंकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव यांनी नुकताच प्रशासक शैलेश कोतमिरे यांना दिला आहे. या वस्तुनिष्ठ अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, बेकायदेशीर आणि बोगस कर्ज वाटप केल्या प्रकरणी संबंधित शेतकरी, बॅंकेचे अधिकारी आणि सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदार राजाराम गायकवाड आणि शहाजी नागणे यांनी केली आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासक पापळ यांची नियुक्ती रद्द

ओझेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांनी आपल्या मर्जीतील सभासदांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याची तक्रार शहाजी नागणे, राजाराम गायकवाड व अरविंद गायकवाड यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बॅंकेचे व्यवस्थापक आर. एस. जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. श्री. जाधव यांनी सोसायटीने वाटप केलेल्या पीक कर्जासंबंधीची चौकशी करून चौकशी अहवाल प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याकडे सादर केला आहे.

सोसायटीचे अध्यक्ष मारुती श्रीरंग गायकवाड यांनी सोसायटीला साडेसहा एकर ऊस पीक असल्याचा दाखला दिला होता. त्या दाखल्यानुसार त्यांना 2 लाख 28 हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी मारुती गायकवाड यांच्या शेतातील प्रत्यक्ष ऊस पिकाची पाहणी केली असता फक्त तीन एकर उसाचे पीक असल्याचे दिसून आले. साडेतीन एकरावर ऊस पीक नसतानाही नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचेही यातून दिसून आले आहे. प्रभाकर जगन्नाथ कोडक यांनीही सोसायटीला अडीच एकरावर उसाचे पीक असल्याचा दाखला दिला होता. प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांच्या शेतात उसाचे पीक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोसायटीने प्रभाकर कोडक यांना शेतात ऊस पीक नसतानाही तब्बल 95 हजार रुपयांचे पीक कर्ज दिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. लक्ष्मण श्रीरंग गायकवाड यांनाही शेतात नसलेल्या अर्धा एकर ऊस आणि अर्धा एकर डाळिंब पिकावर कर्ज वाटप केले आहे. पंचायत समितीच्या उपसभापती राजेश्री भोसले व त्यांचा मुलगा राजवर्धन भोसले यांना एकूण सात एकर द्राक्ष पिकापैकी साडेतीन एकरामध्ये नवीन लागवड केलेल्या द्राक्ष बागेवर कर्ज वाटप केल्याचेही वस्तुनिष्ठ अहवालामध्ये नमूद केले आहे. बोगस पीक दाखल्याच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी बॅंकेचे अधिकारी, सोसायटीच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

हेही वाचा: भाजपच्या माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधी एकही नाही नगरसेवक

ओझेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीने नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. याबाबत संचालक मंडळाला खुलासा द्यावा, असे पत्र दिले आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास सहकार कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सोसायटीच्या सचिवावर देखील कारवाई करावी, असे पत्र दिले आहे.

- एस. एम. तांदळे, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, पंढरपूर

loading image
go to top