esakal | "या' पुस्तकामुळे झाला सिव्हिल इंजिनिअर असलेल्या शेतकऱ्यात क्रांतिकारक बदल ! घडवलाय शंभर टक्के नैसर्गिक शेतीतून चमत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Vasudev Gaikwad

"या' पुस्तकामुळे झाला सिव्हिल इंजिनिअर असलेल्या शेतकऱ्यात क्रांतिकारक बदल ! घडवलाय शंभर टक्के नैसर्गिक शेतीतून चमत्कार

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : "मी पंढरपूर येथील शेतकरी आहे. गेली पंचवीस वर्षे शेती करतो आहे. द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, टोमॅटो, ऊस, तुरी अशी पिके पूर्वी रासायनिक पद्धतीने घेत होतो. युरोप मार्केटसाठी एक्‍स्पोर्ट क्वालिटीच्या द्राक्षांचेही उत्पादन घेत होतो. रासायनिक शेती करत असताना वाढत जाणारी कामे, वाढत जाणारा खर्च, घटत जाणारे उत्पन्न आणि यामुळे वाढणारे मानसिक अस्वास्थ्य अनुभवल्यानंतर वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. बळिराजा मासिकात दाभोलकर पाळेकर यांचे लिखाण वाचले अन्‌ एके दिवशी जपानचे शास्त्रज्ञ मासानोबू फुकुओका यांचे "एका काडातून क्रांती' हे पुस्तक वाचून माझ्याही विचारात क्रांतिकारक बदल झाला...'

सिव्हिल इंजिनिअर असलेले मात्र गेल्या दहा वर्षांपासून आधुनिक प्रयोग करत शंभर टक्के नैसर्गिक शेती करून चमत्कार घडवणारे पंढरपूर तालुक्‍यातील चळे येथील शेतकरी वासुदेव गायकवाड सांगत होते त्यांची यशोगाथा.

पंढरपूर तालुक्‍यातील चळे येथील वासुदेव गायकवाड यांची ही सक्‍सेस स्टोरी रासायनिक शेतीमुळे झालेली दुरवस्था पाहणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे. वाचनाची आवड असणारे गायकवाड यांनी आपल्या या यशाबाबत बोलताना सांगताता, "मी अमृतमयी अन्न पिकवणार व सर्वांना देणार, हे माझ्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे. साधारणपणे पंधरा वर्षे मी या मार्गाने वाटचाल करत आहे. सुरवातीला आम्ही द्राक्ष व डाळिंब हीच पिके घेत असल्याने तीच पिके निवडून काम चालू केले. फक्त निंबोळी तेल हे एकमेव कीटकनाशक फवारणी करून द्राक्ष पिकवणे मला जमत होते. अर्थात बुरशीनाशक मात्र फवारावीच लागत होती. सर्व प्रकारची खते बंद केली होती. माझे उत्पादन घटत गेले, परंतु खर्च कमी होत गेल्याने एकरी निव्वळ नफा मात्र एक लाख याप्रमाणे राहिला. असा पन्नास लाख रुपयांचा मला फायदा झाला. त्याच वेळेस तेवीस एकर डाळिंब लावून ते उत्पादन न घेता उपडून काढावे लागले. कारण ते संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवता आले नाही. द्राक्षही जुनी झाल्याने काढून टाकली व नैसर्गिक पद्धतीने पिकवता येत नाही म्हणून नवीन लागवड केली नाही. पूर्वी मिळालेले पैसे व्यवस्थित गुंतवणूक केल्याने मधली पाच वर्षे उत्पादन न मिळताही मी शेती करू शकलो.'

श्री. गायकवाड पुढे म्हणाले, "काहीतरी चुकतेय हे जाणवत होते. अन्‌ एके दिवशी लक्षात आले, की नैसर्गिक शेती करावयाचा प्रयत्न करत आहे. परंतु, सोलापूर जिल्ह्याचा निसर्ग मला कळलाच नाही. द्राक्ष, डाळिंब ही पिके वाळवंटी प्रदेशात नैसर्गिक पद्धतीने पिकू शकतात. सोलापूर जिल्ह्यात सीताफळ, चिंच, आंबा, मोसंबी व पेरू अशी फळझाडे नैसर्गिक पद्धतीने पिकू शकतात. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी आम्ही आठ एकर सघन पद्धतीने केशर आंबा लागवड केली. चार वर्षांपूर्वी देशी सीताफळ पंधरा एकर लागवड केली. या वर्षीपासून आंबा उत्पादन सुरू होत आहे. तीस टन उत्पादन अपेक्षित आहे. हा आंबा आम्ही स्वतः "पृथ्वी नॅचरल्स' या नावाने विक्री करणार आहोत. कारण, संपूर्णपणे नैसर्गिक उत्पादन असल्याने त्याची चव अत्युत्तम आहे, याची आम्हाला खात्री आहे.'

कशी आहे वासुदेव यांची शेती?

वासुदेव गायकवाड यांच्या 30 एकर जमिनीमध्ये त्यांनी आठ एकरमध्ये केशर आंब्याची झाडे लावली आहेत. नवीन दोन एकर हापूस आंबा लागवड आहे तर एकरमध्ये सीताफळ आणि पाच एकरमध्ये जंगल निर्माण केलंय ते ही चंदन शेतीसाठी. आता त्यात नैसर्गिकरीत्या 400 चंदनाची झाडं आपोआप आली आहेत.

त्यांची शेती आता शेती नसून जंगल बनत चाललं आहे. या शेतीला ते फक्त उसाचे पाचट एवढेच बाहेरून आणतात, तेही लहान रोपांना दिलेल्या ड्रीपच्या पाण्याची ओल टिकावी म्हणून. त्यांच्या शेतीत कुठेही तण काढलेले दिसत नाही ना कोठे साफसफाई. गेल्या 10 वर्षांपासून ना शेतीत नांगरट करतात ना कुळवणी. निसर्गत: जसे असते अगदी तशीच झाडे वाढवायचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे इतरांप्रमाणे यांच्याही फळांवर कीड येते, मात्र त्यालाही ते काही करत नाहीत. जी कीड येते त्याला संपवणारे दुसरे किडेही निसर्गात असतात आणि ते त्यांना नैसर्गिक रीतीने संपवतात असा त्यांचा विश्वास आहे.

एकाबाजूला रासायनिक औषधे आणि खतांचा वापर करून जमिनीचा पोत संपत चालला असताना गेल्या 10 वर्षात माझ्या जमिनीचा पोत खूप वाढल्याचे गायकवाड सांगतात. भविष्यात तर या विषारी रासायनिक शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जमिनी नापीक होतील, त्या वेळी माझी जमीन सगळ्यात जास्त कसदार असेल. त्यामुळे आजही रासायनिक खाते वापरून येणाऱ्या उत्पन्नापेक्षा माझे उत्पन्नही जास्त आहे आणि त्यापेक्षा माझी जमीन आणि मी दोघेही समाधानी असल्याचा त्यांचा विश्वास आहे. माझी आणि माझ्या शेतीच्या गरजाच कमी असून मिळणारे उत्पन्न मी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप जास्त असल्याचे त्यांचे मानणे आहे.

गायकवाड यांच्या घरात 30 पेक्षा जास्त मांजरे असून त्यांच्यामुळे शेतात ना उंदीर आहेत ना साप. कितीही मोठा आणि कोणताही साप निघाला तरी ही मांजरे त्याचा लगेच फडशा पडून मोकळी होतात. सध्या गायकवाड यांच्या शेतात जमिनीला आंबे चिकटले असून यातही त्यांनी एक एकर अति सघन पद्धतीने लावल्याने त्याला चौथ्या वर्षीच उत्पादन मिळायला सुरवात झाली आहे. दुसऱ्या बागेत येणाऱ्या आंब्याला सनबर्नचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पेपर लावले आहेत. झाडावर लगडलेल्या या विषमुक्त केशर आंब्याला मोठी मागणी येत आहे. विशेष म्हणजे अजून हा आंबा उतरायला वेळ असला तरी सोशल मीडियावर वासुदेव गायकवाड यांच्या महायान भास्कर कृषि संस्कृती चॅनेलला पाहणारे देशभरातील शेकडो ग्राहक त्यांच्याशी संपर्क साधत असतात. इतर कोणत्याही आंब्यापेक्षा माझ्या नैसर्गिक आंब्याची चव खाणारे कायम लक्षात ठेवतील, असा दावा वासुदेव गायकवाड करतात.

श्री. गायकवाड म्हणतात, "मी माझे वर्णन जगातील सर्वात श्रीमंत असे करत असतो, परंतु त्याचे खरे कारण माझ्या गरजा कमी आहेत. मी पृथ्वीवरचं स्वर्गीय सुख अनुभवत आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने शेती शक्‍य आहे, असा माझा स्वानुभव आहे. नैसर्गिक शेती हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. जमिनीचा सुधारत जाणारा पोत आणि व्यक्तीचे आध्यात्मिक उन्नयन एकच होय. शेती हा व्यवसाय नसून तो धर्म आहे, हे मी अनुभवत आहे.'

बातमीदार : अभय जोशी